मिरा भाईंदर मध्ये मराठी भाषिकांचा मोर्चा

| वसई | प्रतिनिधी |

मिरा भाईंदर शहरात सध्या मराठी भाषेवरून वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे कार्यकर्त्याकडून एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आल्यानंतर त्या हिंसेच्या निषेधार्थ 2 जुलै रोजी हजारो हिंदी भाषिक व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. हा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप झाला. त्याविरोधात मराठी भाषिक नागरिकांचा मोर्चा काढण्याची घोषणा मनसेने केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मनसेनेही मंगळवारी मिरा भाईंदर शहरात बालाजी हॉटेल ते रेल्वे स्थानक असा मोर्चा काढला आहे. सकाळी दहा वाजल्या पासूनच या आंदोलनाला सुरवात झाली आहे. यात मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते व मराठी भाषिक नागरिक व संघटना सहभागी झाल्या असून, मराठी अस्मिता टिकली पाहिजे अशी घोषणाबाजी आंदोलन कर्त्यांनी सुरू केली आहे. मराठी भाषे विषयी अपशब्द व त्यावर होत असलेला अन्याय आम्ही सहन करणार नाही असे आंदोलकांनी सांगितले.

मराठी भाषिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर, घटनास्थळी उपस्थित असलेल्या हिंदी भाषिक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केल्याचे दिसून आले. मराठी भाषिक मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही, सकाळी दहा वाजल्यानंतर मिरा रोड येथील बालाजी हॉटेल परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमा होऊ लागले. या वेळी घटनास्थळी येणाऱ्या प्रत्येक मराठी भाषिक नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली, ज्यामुळे आंदोलकांत संताप उसळला. त्यातून परिसरात काही क्षणांतच तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांच्या कारवाईला विरोध म्हणून आंदोलकांनी वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागून परिसरात विखुरले जात असल्याचे दिसून आले. काही वेळाच्या अंतराने ते बालाजी चौकात पुन्हा जमू लागले. मागील सुमारे तीन तासांपासून ही स्थिती सुरू असल्यामुळे परिसरात सतत तणावाचे वातावरण आहे. मिरा भाईंदर मध्ये मराठी भाषिकांचा मोर्चा, आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू परिस्थितीचा परिणाम म्हणून परिसरातील व्यापारी दुकानदारांनी आपली दुकाने बंद करण्यास सुरुवात केली आहे. विशेष बाब म्हणजे, ज्यांच्या दुकानामुळे हा वाद निर्माण झाला ते जोधपूर मिठाई हे दुकानही सकाळपासूनच बंद आहे.

नेमकं काय घडलं होतं?
जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाने मराठी भाषा बोलण्याची गरज काय, असे वक्तव्य केले होते. त्यावरुन मनसेचे कार्यकर्ते त्याला जाब विचारायला गेले होते. तेव्हादेखील या दुकान मालकाचा मराठी न बोलण्याचा हेका कायम होता. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी या दुकान मालकाच्या कानाखाली जाळ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर मीरा-भाईंदरमधील अमराठी व्यापारांनी मोर्चा काढला होता.
Exit mobile version