| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. निवडणुकीत थेट जनतेमधून सरपंचपद निवडून येणार असल्याने इच्छुकांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. मात्र, निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी सातवी पास असण्याची अट टाकली असल्याने अनेकांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.
निवडणुकीत सदस्य किंवा सरपंच पदाची निवडणूक लढवणारा उमेदवार 1 जानेवारी 1995 रोजी किंवा यानंतर जन्माला आलेला असेल, तर तो किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय थेट सरपंच हा जनतेमधून निवडून आला असला तरी तो ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सदस्य असल्याने सदस्यांसाठी असणारी शिक्षणाची अर्हता ही सरपंच पदालाही लागू असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करताना जन्मतारखेचा व शैक्षणिक पात्रतेचा पुरावा जोडावा लागणार असल्याने इच्छुकांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे.
थकलेल्या कराचा भरणा
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गाव, वाडी, वस्ती, तांड्यावरील अनेक जण तयारीला लागले आहेत. ग्रामसेवकाकडून घरपट्टी, नळपट्टी भरल्याची पावती, स्वच्छतागृह असल्याचे प्रमाणपत्र, याचबरोबर विविध शपथपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आदी कागदपत्रे मिळवण्यासाठीची लगबग सुरू आहे. विशेष म्हणजे, निवडणुका असल्याने अनेकांनी थकलेल्या कराचा भरणा केल्याने ग्रामपंचायतींची कर वसुली झाली आहे.
घरोघरी गाठीभेटींचा सपाटा
शहरात राहण्यासाठी गेलेले नेते मंडळी एरव्ही ग्रामस्थांपासून चार हात दूर फटकून राहणारी, आता ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गावाकडे आली असून ग्रामपंचायत आपल्याच पॅनेल, पक्षाकडे, गटाकडे कशी राहील, यासाठी चाचपणी करत आहेत; तर दुसरीकडे मतदारांच्या खुशाली विचारत घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत आहेत.