। पनवेल । प्रतिनिधी ।
नांदेड येथून तळोजा येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या त्रिकुटापैकी एका तरुणाला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत गौतम आवटे (18) असे या तरुणाचे नाव असून त्याचे दोन साथीदार या कारवाई दरम्यान पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या कारवाईत पोलिसांनी 20 लाख 76 हजार रुपये किंमतीचा 41.532 किलो ग्रॅम वजनाचा गांजाने भरलेल्या तीन बॅगा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी आता पळून गेलेल्या दोघांचा शोध सुरु केला आहे.
पनवेल-मुंब्रा मार्गावरुन काही तरुण रिक्षामधुन गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती तळोजा पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबु खाटपे, सहाय्यक फौजदार कंखरे, पोलीस हवालदार भोईर, डुंबरे, पोलीस नाईक करडे, पोलीस शिपाई पठाण, पवार आदींच्या पथकाने पनवेल मुंब्रा मार्गावरील धानसर टोल नाका येथे सापळा लावला होता. यावेळी नांदेड येथून गांजा घेऊन ट्रॅव्हल्स बसने कळंबोली सर्कल येथे उतरलेले अनिकेत, इरफान आणि रईस हे तिघेही रिक्षाने भिवंडी नाका येथे जात असताना, पोलिसांनी धानसर टोलनाक्यावर त्यांची रिक्षा अडवून त्याची तपासणी सुरु केली. याचवेळी इरफान शेख आणि रईस या दोघांनी संधी साधुन रिक्षामधुन पलायन केले. त्यामुळे पोलिसांनी अनिकेत आवटे याला ताब्यात घेऊन रिक्षामध्ये असलेल्या तीन बॅगांची तपासणी केली असता, त्यात तब्बल 20 लाख 76 हजार रुपये किंमतीचा 41.532 किलो ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ आढळून आला.
20 लाख 76 हजारांचा गांजा जप्त
