गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठा सजल्या

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।

गणेशोत्सवाला केवळ काहीच दिवस शिल्लक असल्याने शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. दिवसेंदिवस शहरात ग्रामीण भागातून येणार्‍या गणेशभक्तांची गर्दी वाढत आहे. अलिकडे थर्माकॉलवर बंदी आल्यानंतर गणपतीची सुशोभित आरास तयार करण्यासाठी प्लास्टिक फुले, फोम तसेच पुठ्ठा, कागद यांचा वापर केला जात आहे.

गणेशोत्सवात लागणार्‍या विविध साहित्याची दुकाने सजली आहेत. अगदी दरबार व निसर्गचित्रांचे पडदे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. गणेशोत्सवाला 7 सप्टेंबरला सुरवात होणार आहे. त्यामुळे भाविकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली आहे. बाजारपेठेत आकर्षक प्लास्टिक फुले, माळा, फोम, पुठ्ठा, रंगीत कागद, पडदे, इलेक्ट्रिक साहित्यांनी दुकाने भरगच्च भरली आहेत. गणेशोत्सवात आरासासाठी लागणार्‍या वस्तू ग्राहकांकडून खरेदी केल्या जात आहेत.फूटपाथचा परराज्यातील व्यावसायिकांनी ताबा घेतला आहे. उत्तरप्रदेशातून आलेले हे व्यावसायिक छोटे ताशे, ढोलकी, ढोलक यांची विक्री करत असून बाजारपेठेत फिरूनही विक्री करत आहेत. गणेशोत्सवातच रत्नागिरीत येत असल्याचे उत्तरप्रदेश येथील ढोलक विक्रेत्याने सांगितले तसेच शहरातील फूटपाथवर प्लास्टिकच्या विविध वस्तू, इलेक्ट्रिक सामान विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. विविध प्रकारच्या रांगोळ्या बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या आहेत. रामआळी, गोखलेनाका ते मारूती मंदिरपर्यंत भाविकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे.

दरम्यान, गतवर्षी जिल्ह्यात 1 लाख 15 हजार 234 घरगुती तर 17 सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना झाली होती. या पार्श्‍वभूमीवर पोलीस सतर्क झाले असून, जिल्ह्यात विविध ठिकाणी पथके तयार केली आहेत. अनंत चतुर्दशीपर्यंत वाजतगाजत येणार्‍या गणेश मिरवणुकीपासून विसर्जनापर्यंत पोलिसदलाचे या उत्सवावर लक्ष राहणार आहे.

Exit mobile version