खरेदीला सुरुवात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नवरात्रौत्सवानंतर आता दिवाळीचे वेध लागले आहेत. जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये आकाश कंदिलांसह रांगोळीच्या साहित्यांची देखील दुकाने सजण्यास सुरूवात झाली आहे. ग्राहकांच्या पसंतीचे कंदील बाजारात उपलब्ध झाले असून खरेदीला सुरुवात झाली आहे. यावेळी प्लास्टिक कंदिलांसह कागदी कंदिलदेखील बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. यावर्षी कंदिलाच्या किंमतीमध्ये काही प्रमाणात घट झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.
दिवाळीमध्ये करंजा, चकल्या आदी फराळ खाण्याचा आनंद होत असताना वेगवेगळ्या आकाराचे व रंगांचे लहान-मोठे कंदील घरासमोर लावण्याचा आनंददेखील मोठा असतो. त्यामुळे घरासमोर कोणत्या प्रकारचे कंदील असावे, याचे नियोजन काही ठिकाणी केले जाते. तर, काहीजण बाजारात उपलब्ध असलेले आकर्षक कंदील खरेदी करून ते घरासमोर लावत असतात. लहान कंदीलासंह मोठ्या कंदिलांचा झगमगाट कायमच नागरिकांना एक वेगळा उत्साह देणारा असतो.
यंदा दिवाळी सण शुक्रवार दि.17 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. शुक्रवारी वसूबारस असून शनिवारी (दि.17) धनत्रयोदशी, सोमवारी (दि.20) नरक चतूर्दशी, मंगळवारी (दि.21) लक्ष्मीपूजन, बुधवारी (दि.22) बलिप्रतिपदा आणि गुरुवारी (दि.23) भाऊबीज आहे. दिवाळीनिमित्त शाळा महाविद्यालयांना सुट्टी असते. त्यामुळे या कालावधीत जिल्ह्यात मोठा जल्लोष साजरा होणार आहे. दिवाळी सुरु होण्यासाठी आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, बाजारपेठांसह ठिकठिकाणी फटाके व आकाश कंदील विक्रीसाठी दुकाने उभारू लागली आहेत. बाजारपेठेत शंभर रुपयांपासून साडेसहाशे रुपयांपर्यंत कंदील विक्रीसाठी आहेत. त्यामध्ये कागदी व प्लास्टिकच्या कंदीलांचा समावेश आहे. गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी कंदीलच्या किंमतीत घट झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. लहान कंदील 15 रुपयांपासून 20 रुपयांपर्यंत आहेत. हे कंदीलदेखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.






