| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
कारगिल युद्धात मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहीद निलेश तुणतुणे यांचा 28वा स्मृतिदिन शनिवारी (दि. 1) सहाणगोठी येथे श्रद्धापूर्वक साजरा करण्यात येणार आहे. शहीद निलेश तुणतुणे ट्रस्ट आणि पंचायत समिती अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास शहीद निलेश तुणतुणे यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी पोलीस दलाकडून शहीद जवानाला मानवंदना देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे, जिल्हा सैनिक अधिकारी ले. कर्नल राहुल माने, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील, जिल्हा होमगार्ड माजी समादेशक ॲड. के.डी. पाटील, शहीद निलेश तुणतुणे ट्रस्टचे अध्यक्ष द्वारकानाथ नाईक, गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, गटविकास अधिकारी शर्मिला पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, रायगड जिल्हा परिषद शाळेसह माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून लेझीम व कलापथकाचे सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
शहीद निलेश तुणतुणेंचा उद्या स्मृतिदिन
