| मुंबई | प्रतिनिधी |
‘गोल्डन व्हॉईस ऑफ इंडिया’ म्हणून ओळखला जाणारा शान मुखर्जी हे भारतीय संगीत क्षेत्रातील आघाडीच्या नावांपैकी एक आहे. दरम्यान, त्याच्याबद्दलची एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक शान राहत असलेल्या इमारतीला आग लागण्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (दि.24) पहाटे 1.45 वाजता वांद्रे पश्चिम येथील फॉर्च्यून एन्क्लेव्ह या निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागली होती. इमारतीतून प्रचंड धुराचे लोट बाहेर येत असल्याचे पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार,आग लागल्याच्या वेळी शान आणि त्याचे कुटुंबीय घरात उपस्थित होते. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शान व त्याचे कुटुंबीय सर्वजण सुरक्षित आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, शान आणि त्याचे कुटुंबीय इतर लोकांसमवेत इमारतीच्या बाहेर उभे असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली असून, त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.