| मुंबई | वार्ताहर |
मुंबईतील अंधेरी पूर्व येथील चाकाला परिसरातील ज्योती हॉटेलला मध्यरात्री भीषण आग लागली होती. सध्या ही आग विझवण्यात आली असली तरी यामध्ये हॉटेलचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अग्निशमन दलानं मोठ्या शर्थीनं प्रयत्न करुन ही आग आटोक्यात आणली. यावेळी हॉटेलमध्ये 35 नागरिक होते, त्यांना सुखरुपणे बाहेर काढण्यातही यश आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 3च्या सुमारास ज्योती हॉटेलच्या 6 वा मजल्यावर ही आग लागली. या आगीत हॉटेलमध्ये 35 लोक अडकले होते. घटनेची माहिती मिळतच अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर तब्बल एक तास प्रयत्न केल्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. हॉटेलच्या आत अडकलेले सर्व 35 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दरम्यान, सुदैवाने या आगीत कुठलीही जीवित हानी झालेली नाही मात्र हॉटेलच्या काही खोल्या जळून खाक झाल्या आहेत. वेळत अग्निशमन दलाला पाचारण केल्यानं पुढील संभाव्य धोका टळला. या संदर्भात अंधेरी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं अधिक तपास करत आहेत.