| पेण | प्रतिनिधी |
तरणखोप येथील संतोष शेठ घरत यांच्या पेढयाच्या गोदामाला शॉर्टसर्कीटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा तात्काळ पंचनाम करण्याची मागणी करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तरणखोप ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गाच्या शेजारी संतोष शेठ घरत यांचे पेंढ्याचे मोठे गोडाऊन आहे. त्या गोडाऊनमध्ये जवळपास 1500 ते 1600 पेंढ्यांच्या गठळ्या होत्या. अचानक शॉर्टसर्कीट होऊन पेंढ्याला आग लागली. दुपारची वेळ असल्याने या आगीने रौद्ररुप धारण केले. शेजारी असलेल्या संतोष शेठ यांच्या घरात धुराचे लोळ पसरले. शेवटी आग विझवण्याचे प्रयत्न अपुरे पडायला लागले. त्यावेळी पेण नगरपालिकेचे अग्नीशामक दल व जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचे अग्नीशामक दलाला पाचारण केले. परंतु, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पेंढ्याच्या गठळ्यांना आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले होते. शेवटी प्रसार माध्यमांनी माहिती घेतल्यानंतर असे समजले की, साधारणतः 10 ते 12 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती तहसीलदार तानाजी शेजाळ यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी भ्रमंती ध्वनीवरुन दिली असता त्यांनी घटनास्थळी मंडळ अधिकारी व तलाठी यांना तातडीने पाठवणार असल्याचे प्रतिनिधींना सांगितले. आग विझविण्यासाठी उशिरापर्यंत जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचे अग्नीशामक दल व पेण नगरपालिकेचे अग्नीशामक दल शर्थीचे प्रयत्न करीत होते.