नारीशक्तीपुढे नगरपरिषद नमली; तात्काळ कार्यवाहीचे आदेश
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषद हद्दीमधील गुंडगे परिसराला नळाद्वारे दुपारचे वेळी येणारे पाणी सकाळच्या वेळी सोडण्यात यावे यासाठी गुंडगे भागातील महिलांनी एकत्र येत साखळी उपोषण सुरू केले होते. महिलांची मोठी उपस्थिती सलग दोन दिवस राहिल्याने अखेर कर्जत नगरपरिषद प्रशासन नमले असून, गुंडगे परिसराला पहाटे, तर विश्वनगर भागाला सकाळच्या वेळी पाणी सोडण्यात सुरुवात झाली आहे. अखेर नारीशक्तीपुढे नमते घेत नगरपरिषद प्रशासनाने महिलांची मागणी मान्य केली. दरम्यान, लेखी आश्वासनानंतर साखळी उपोषण स्थगित करण्यात आले.
शहरातील गुंडगे परिसरात पूर्वी सकाळच्या वेळी पाणी यायचे. त्यामुळे नोकरदार महिला यांना सकाळची कामे उरकून कामाच्या ठिकाणी पोहोचणे शक्य असायचे. मात्र, गेली काही महिने कर्जत नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाने गुंडगे भागात दुपारच्या वेळी पाणी वितरित करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून गुंडगे भागातील महिलांनी कर्जत नगरपरिषदेकडे सातत्याने मागण्या केल्या होत्या. परंतु, पालिका प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी मोर्चादेखील काढला होता. अखेर गुंडगे गावातील महिलांनी आपल्या सर्व भागातील समस्या दूर करण्यासाठी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता.सलग दोन दिवस साखळी उपोषण करण्यात आल्यानंतर कर्जत नगरपरिषदेचे नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी तानाजी चव्हाण तसेच कार्यालयीन अधीक्षक रवींद्र लाड आणि पाणी पुरवठा अभियंता अभिमन्यु येलवंडे यांनी उपोषणस्थळी जाऊन महिलांची भूमिका समजून घेतली.त्यानंतर पालिकेने महिलांच्या सर्व मागण्या मान्य करीत असल्याचे पत्र दिल्यानंतर साखळी उपोषण स्थगित करण्यात आले. या साखळी उपोषणाला कर्जत शहरातील सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता तसेच अनेक सामाजिक संघटना या साखळी उपोषणात महिलांच्या पाठीशी उभ्या राहिल्या होत्या.
कर्जत नगरपरिषदेने लेखी निवेदन महिला उपोषण कर्त्यांना दिल्यानंतर महिलावर्गाचे समाधान झाले आणि त्यानंतर साखळी उपोषण स्थगित करण्यात आले. त्यात गुंडगे भागात पूर्वीप्रमाणे पहाटे साडेचार ते साडेसहादरम्यान या नळाला पाणी येईल असा निर्णय घेत त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली. त्याचवेळी विश्वानगर भागाला साडेसहा ते साडेसात या वेळेत पाणी पुरवठा करण्याचीदेखील कार्यवाही कर्जत नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाने केली. त्याचवेळी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असलेल्या ठिकाणी पालिका पाणीपुरवठा अभियंता अभिमन्यु येलवंदे यांच्याकडून पाहणी करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यानंतर महिलांनी आपले साखळी उपोषण स्थगित केले असून, या उपोषणाला साठहून अधिक वर्षे वयाच्या महिलादेखील बसल्या असल्याने पालिका प्रशासनाला नमते घ्यावे लागले.