। ठाणे । प्रतिनिधी ।
तारापूर एमआयडीसीमधील विराज प्रोफाइल या कंपनीमध्ये शनिवारी (दि.8) रात्री भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, घटनेदरम्यान प्राण वाचवण्यासाठी कामगारांची पळापळ सुरू होती. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. आग लागताच मोठमोठे स्फोट झाले असून त्याच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला होता.
तारापूर एमआयडीसीमध्ये विराज प्रोफाइल लिमिटेड नावाची कंपनी असून त्या कंपनीत तीन शिफ्टमध्ये काम चालू असते. या ठिकाणी लोखंडी भंगार वितळवून त्यापासून तारा, वायर्स व अन्य वस्तू बनवल्या जात असतात. दुसरी शिफ्ट संपायची वेळ आली असताना शनिवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास अचानक फर्निश ऑइलच्या भट्टीला आग लागली. काही क्षणातच ही आग पसरत गेली आणि कंपनीतील कामगार जीवाच्या आकांताने बाहेर पडण्यासाठी धडपड करू लागले होते. दरम्यान, ही आग आजूबाजूलाही पसरली असून आग विझवण्यासाठी तारापूर पालघर व विविध भागांतून 8 ते 10 पाण्याचे टँकर्स दाखल झाले होते. पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, अॅम्ब्युलन्स व अन्य आपत्कालीन यंत्रणा देखील घटनास्थळी तात्काळ पोहोचली होती. यावेळी आग विझवण्याचे रात्री उशिरापर्यंत शर्तीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्यापि समजलेले नाही.
तारापूर एमआयडीसीत भीषण आग
