निकृष्ट कामामुळे अपघाताचा धोका वाढला
| चौल | प्रतिनिधी |
अजून रस्त्याचे काम पूर्णही झालेले नाही, तोवरच नव्याने तयार केलेल्या बेलकडे-सहाण मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. वर्षभराचा कालावधीही पूर्ण झालेला नसताना सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने कामाच्या दर्जावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला असून, रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अलिबाग तालुक्यातील अलिबाग-रेवदंडा मुख्य रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम एमएसआयडीसीकडून करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग असलेल्या बेलकडे ते सहाण बायपास रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, रस्ता पूर्णत्वास जाण्यापूर्वीच त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
बेलकडे ते सहाणदरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. अचानक आलेल्या खड्ड्यांमुळे वाहने आदळत असून, वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. रात्रीच्या वेळी खड्डे स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला आहे. नवीन रस्ता तयार होताच त्याची अशी दुरवस्था होत असेल, तर कामाच्या दर्जाची तपासणी नेमकी कुणी केली? असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने केवळ वरवरची डागडुजी न करता रस्त्याची तातडीने पाहणी करून निकृष्ट कामाची चौकशी करावी आणि आवश्यक त्या ठिकाणी दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या खड्ड्यांमुळे एखादा मोठा अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
