खा. सुनिल तटकरे यांची माहिती
। म्हसळा । वार्ताहर ।
तालुक्यातील कोव्हिड रुग्णसंख्या कमी होत असतानाच म्हसळा शहरासह तालुक्याचा विकास कामांचा आढावा खा. सुनिल तटकरे यांनी म्हसळा पंचायत समितीच्या सभागृहात घेतला. त्याचवेळी पत्रकारांजवळ संवाद साधताना तटकरे यांनी लवकरच म्हसळा आम्ही शहराच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार करणार आहोत सर्वांच्या सहभागाने पालकमंत्री आदिती तटकरे याबाबत बैठक घेणार असल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले.
म्हसळा शहराचे मास्टर प्लॅन मध्ये,वाढीव व विस्तारीत नागरी वस्तीसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा वितरण व्यवस्था, म्हसळा नळ पुरवठा योजने साठी अद्ययावत फिल्टरेशन प्लँट, अंर्तगत रस्ते व गटारे, शहरातील हिंगुळ डोह देवी स्थान विकसीत करणे, पर्यटनासाठी जानसई नदीपात्राचा उपयोग करणे याबाबत शहराचे सर्वेक्षण करण्याबाबत मार्गदर्शक नेमून अद्ययावत आराखडा तयार करण्यात येणार आसल्याचे सांगितले.
यावेळी जि.प.चे कृषी आणि पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, प्रदेश चिटणीस अलिशेठ कौचाली, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदिप चाचले, तालुका अध्यक्ष समिर बनकर,नाजीम हसवारे उपस्थित होते.
लसीकरणाबाबत नाराजी
म्हसळा तालुक्यात म्हसळा, मेंदडी व खामगाव या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथे लसीकरण केंद्र सुरु आहेत. ग्रामिण भागात लसीकरण बरे आहे. शहरातील लसीकरण लक्षणीय कमी असल्याबाबत खा. तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली.