। कोर्लई । वार्ताहर ।
केरळ येथे संपन्न झालेल्या मास्टर्स चषक 2024 या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून दोन रौप्य व चार कांस्यपदके पटकावली आहेत. यात मजगावचे ध्रुव कळके, रेश्मा भोईर आणि काव्या या खेळाडूंचा समावेश आहे.
मास्टर्स चषक ही राष्ट्रीय कराटे स्पर्धा नुकत्याच केरळ राज्यात वायनाड जिल्ह्यातील सुलतान बत्तेरी येथे रविवारी (दि.27) संपन्न झाली. यात महाराष्ट्रातील सात कराटेपट्टूंची निवड करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि नऊ कांस्यपदके पटकावली आहेत. यात मुरूड तालुक्यातील मजगाव येथील छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयात शिकणारे ध्रुव कळके, रेश्मा भोईर, काव्या नाक्ती यांचादेखील समावेश आहे.
या सर्व कराटेपट्टूंना आंतरराष्ट्रीय पंच क्योशी विजय चंद्रकांत तांबडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षक रेन्शी अभिषेक गजानन तांबडकर व सेन्सई आकांक्षा विजय तांबडकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या या यशानंतर शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून गावात सर्वत्र कौतुक होत आहे.