। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक गुरुवारी खोपोलीच्या ताकई विठ्ठल मंदिराच्या सभागृहात पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर मात्र गैरहजर असल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या असून, मसुरकर जाणूनबुजून गैरहजर राहिले की त्यांना बोलावले नाही? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला.
यावेळी विधानसभेत झालेल्या बेईमानांवर जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी टीकास्त्र सोडीत त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आदेश देत आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले. तसेच सेनेच्या आमदारावर व शिवसेनेवर टीकेची झोड उठवीत युती आघाडीच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.
खालापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीला जी.प सदस्य तथा तालुकाध्यक्ष नरेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष एच.आर. पाटील, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, उपसभापती विश्वनाथ पाटील, जि.प. सदस्या उमा मुंढे, पद्मा पाटील, महिला तालुका अध्यक्षा श्वेता मनवे, कुमार दिसले, सुरेश पाटील, शरद कदम, ज्ञानेश्वर गायकवाड, शेखर पिंगळे, शंकर माणकवले, आजीम करंजीकर, प्रसाद पाटील, भूषण पाटील आदींसह खालापुरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






