Mathadi Workers’ Protest: माथाडी कामगार रस्त्यावर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शासकीय गोदामामध्ये काम करणारे माथाडी कामगार त्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. अखिल भारतीय माथाडी, सुरक्षारक्षक, श्रमजिवी, आणि जनरल कामगार युनियनच्यावतीने सोमवारी (दि.25) अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

या आंदोलनामध्ये कामगार नेते अविनाश शमिष्टे, राजाराम कंक, निवृत्ती धुमाळ नरेंद्र पाटील आदी असंख्य माथाडी कामगार सहभागी झाले होते. राज्य शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना एफसीआयच्या बेस डेपोतून थेट वाहतूक करून दुकानदारांना धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक ठेकेदार यांनाच माल हाताळणुकीचे काम देण्याबाबत या निर्णयामध्ये प्रस्तावित आहे. वाहतूकीच्या कामामध्ये माल हताळणुकीचे काम करण्यासाठी वाहतूक ठेकेदाराला त्यांचे कामगार लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय धान्य गोदामामध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांचा रोजगार संपुष्टात येण्याची भिती माथाडी कामगारांनी व्यक्त केली आहे.

ट्रकमधून दुकानदारांना धान्य देण्याच्या प्रक्रियेमध्ये हाताळणुकीसाठी लागणारे कामगारही कंत्राटदारांनी त्यांचे स्वतःचे आणावयाचे आहेत. त्यामुळे सर्व माथाडी कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची चिंता निर्माण झाली आहे. शासनाच्या या भूमिकेमुळे माथाडी कामगारांसह त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विविध शासकीय धान्य गोदामातील पहिला टप्पा व दुसऱ्या टप्प्यासह थेट वाहतूकीतील अन्न धान्य शिधावाटप दुकानांमध्ये वजन करून उचलून थप्पी लावून ठेवणे. माथाडी मंडळाच्या नोंदीत माथाडी कामगारांना सध्या मिळत असणाऱ्या वेतनाची सरासरी काढून त्याचे मासिक वेतन ठरविण्यात यावे. वेतन संरक्षित करण्यात यावे, अशा अनेक मागण्यांसाठी शासकीय धान्य गोदामामध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगार संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.25) अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रायगड जिल्ह्यातील 250 हून अधिक कामगार सहभागी झाले आहेत. यावेळी कामगारांनी शासनाविरोधात घोषणा देत शासनाच्या भुमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. ही लढाई शेवटपर्यत सुरु राहणार आहे. अन्यथा उपोषणाची भुमिका घेतील जाईल असा इशारा माथाडी कामगारांनी यावेळी दिला.

Exit mobile version