| नेरळ-माथेरान | प्रतिनिधी |
माथेरान मधील पर्यटन हंगामात पाण्याच्या पुरवठ्याबाबत हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग व्यावसायिक आणि स्थानिकांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, असे स्पष्ट आश्वासन कार्यकारी अभियंता एस.पी. वेंगुर्लेकर यांनी दिले आहे.
माथेरानसाठी एक नवीन पंप कार्यान्वित होणार असून, दि.10 जूनपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता तसेच मेंटेनेस टीम माथेरानमध्ये तैनात असणार आहे. असे स्पष्ट आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्याकडून पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. आज सकाळी ही पंप नेरळ माथेरान घाट येथे पोहचले आहे.
माथेरानसाठी कुंभे येथे असलेल्या पंप हाउसमध्ये येथील उल्हास नदीतील पाणी उचलले जाते. या मार्गावर असलेले पाण्याची गळती आणि तीन ठिकाणी असलेले पंप हाउस यामुळे पाण्याचा पुरवठा कमी दाबाने होत होता. त्यात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाणी पोहचवण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन तीनही पंप हाउस येथे स्टँड बाय स्वरूपात नवीन पंप उपलब्ध ठेवण्यासाठी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांचे प्रयत्न सुरू होते. सध्या माथेरान येथील पर्यटन हंगाम जोरात असल्याने आमदार महेंद्र थोरवे यांनी जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता संदीप वेंगुर्लेकर यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी अतिरिक्त पंप खरेदी करण्याचा आग्रह धरला होता. शेवटी त्यातील वॉटर पाईप येथे अतिरिक्त पंप खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हा पंप वॉटर पाईप येथे बसवून घेण्यात येईल, याबाबत अधिकृत माहिती कार्यकरी अभियंता वेंगुर्लेकर यांच्या कार्यालयात नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी आणि उप नगराध्यक्ष संतोष शेलार यांना दिली.
माथेरानच्या नगराध्यक्षांच्या प्रयत्नांना यश
