पाणी सोडले, गाळ मात्र तसाच; आता पाण्याचे नियोजन कसे करणार?
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरात असलेल्या शार्लोट लेक तलावाचे संवर्धन करण्याचे काम केंद्र सरकारच्या अमृत-2 मधून सुरु आहे. या तलावातील 2600 ब्रास माती काढून शहरातील रस्त्यांसाठी वापरली जाणार होती; मात्र, ठेकेदाराची मर्जी राखण्यासाठी तलावातील गाळ पावसाळ्यातील पाण्याबरोबर वाहून जाईल या हेतूने तलावातील पाणी सोडून देण्यात आले. शार्लोट लेक हे माथेरान नगरपरिषदेच्या मालकिचे असून, धरणातील पाण्याची मालकी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे. असे असतानाही नगरपरिषदेने पाणी सोडलेच कसे आणि पाणी सोडण्यासाठी प्राधिकरणाने चावी दिलीच कशी, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. /
दरम्यान, एवढे करूनही शार्लोट लेक तलावातील गाळ आहे तसाच आहे. त्यामुळे माथेरान नगरपरिषदेच्या मालकीचा शार्लोट लेक तलावातील गाळ 2013 मध्ये काढण्यात आला होता. त्यापूर्वी रोजंदारीवर मजूर घेऊन गाळ काढला जात होता. परंतु, मागील 12 पेक्षा अधिक वर्षे साठून राहिलेला गाळ काढण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत-2 मधून 5 कोटींचा निधी माथेरान नगरपरिषदेला मिळाला आहे. या निधीतून धरणातील 2600 ब्रास माती काढणे तसेच तलावाच्या आजूबाजूला भविष्यात माती वाहून येऊ नये यासाठी गॅबियन वॉल बांधण्याचे नियोजन होते. तसेच, तलावातील 2600 ब्रास मातीमिश्रित गाळ शहरातील रस्त्यासाठी वापरण्याचे निर्देश निविदेत आहेत. शार्लोट लेक हे माथेरान नगरपरिषदेच्या मालकिचे असले तरी त्यातील पाण्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मालकी आहे. मात्र, असे असतानाही ठेकेदाराला खुश करण्यासाठी माथेरान नगरपरिषदेने शार्लोट लेक मधील पाणी सोडून देण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला पालिकेतील स्वीकृत सदस्य माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी विरोध केला. तत्पूर्वी नवी मुंबई महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग आणि जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून धरणातील पाणी सोडण्यात येऊ नये असे आदेश देण्यात आले होते. परंतु, तरीदेखील माथेरान नगरपरिषदेने 10 ऑगस्ट रोजी शार्लोट लेक मधील पाणी सोडून दिले. या लेकचे पाणी सोडण्याचा मार्ग असलेल्या विहिरींची चावी हि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहे. असे असतानाही जीवन प्राधिकरणाकडील चावी माथेरान नगरपरिषदेला कोणी दिली, असा प्रश्न निर्मण झाला आहे.
दरम्यान, धरणातील पाणी हे शार्लोट लेक मधील गाळासोबत वाहून जावे, यासाठी पाणी सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील शार्लोट लेक मधील गाळ आहे तसाच असल्याने नगरपरिषदेचा पाणी सोडण्याचा डाव त्यांच्यावर पालटला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता हा गाळ बाहेर काढण्यासाठी ठेकेदार काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरी बाब म्हणजे माथेरानमध्ये इंधनवर चालणाऱ्या कुठल्याही वाहनांना परवानगी नसल्याने मनुष्यबळ वापरून गाळ काढावे लागणार आहे. हि बाब लक्षात घेऊन शासनाने आता शार्लोट लेक गाळमुक्त करण्याची मोहीम यशस्वी करण्यसाठी पुढाकार घेण्याची मागणी माथेरानकरांकडून करण्यात येत आहे.
मात्र, आता त्याहून बिकट परिस्थिती माथेरानमध्ये निर्माण झाली आहे. शार्लोट लेक मधील पाणी सोडल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. पावसाळ्यात नेरळ येथील उल्हास नदीवरून उचलले जाणारे पाणी बंद असते. त्यामुळे पावसाळ्यात माथेरानमधील नळाला शार्लोट लेक मधून पाणी दिले जाते. मात्र, शार्लोट लेकमध्ये पाणीच राहिले नसल्याने नळाला पाणी सोडणार कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकतर नेरळ येथून पाण्याचा उपसा करून माथेरानकरांना पाणी वितरित करावे लागणार आहे. किंवा उल्हास नदीचे गढूळ पाणी प्यावे लागणार आहे. त्यामुळे त्यामुळे सध्यातरी माथेरानकरांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.
लेक कधी भरणार?
शार्लोट लेक पूर्ण भरण्यासाठी किमान महिनाभर पावसाची गरज असते. त्यात आता ऑगस्ट महिना सुरु आहे. तलावातील गाळ काढण्यासाठी किमान महिना लागण्याची शक्यता आहे. हि बाब लक्षात घेता माथेरान नगरपरिषद आपले धरण पाण्याने भरावे यासाठी काय करणार? तसेच, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाण्याचा साठा शार्लोट लेक मध्ये व्हावा यासाठी कोणती भूमिका घेणार? याकडे माथेरानकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
कारवाई कोणावर?
माथेरान पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीच्या पाण्यावर हक्क आहे. त्यामुळे पाणी सोडण्यासाठी धरणाच्या विहिरींची चावी माथेरान नगरपरिषदेला कोणी दिली? त्याचवेळी वरिष्ठ म्हणत असताना प्राधिकरणाच्या कोणत्या अधिकाऱ्याने ती चावी दिली आणि पाणी सोडले याचा शोध शासन घेणार का? नवी मुंबई महापालिका मोरबे धरणाच्या परिसरात पाणी सोडणाऱ्या माथेरान नगरपरिषदेवर कारवाई करणार का? असे अनेक प्रश्न शार्लोट लेक मधील पाणी सोडल्याने पुढे आले आहेत.
