। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमधील प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर आणि वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्यामंदिर या दोन्ही शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना जपानी भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. आत्ता माथेरानमधील विद्यार्थी जपानी भाषा शिकणार. ही भाषा शिकविण्यासाठी मुंबईतील तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये शिक्षण दिले जाते.त्याच धर्तीवर माथेरान मध्ये सुद्धा मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये शिक्षण दिले जात आहे. मात्र प्रथमच माथेरान मधील प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर आणि वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्यामंदिर या दोन्ही शाळेतील विध्यार्थ्यांसाठी जपानी भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. ही जपानी भाषा येथील विध्यार्थी शिकल्यास याचा फायदा माथेरान पर्यटन क्षेत्राला होणार आहे कारण माथेरान पर्यटन क्षेत्रामध्ये जपानी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.
माथेरान नगरपरिषदेचे माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव यांच्या सहकार्यातून मुलुंड येथील जपानी भाषा शिक्षिका विद्या जबलपूरवाला आणि मुर्तुझा जबलपूरवाला यांच्या माध्यमातून इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना जपानी भाषा प्रशिक्षण सुरू केले आहे. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रशिक्षण वर्गाला मिळाला आहे. आठवड्यातून एक दिवस हा प्रशिक्षण वर्ग सुरू असणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन दि.22 फेब्रुवारी रोजी प्रा.शां.य.गव्हाणकर विद्यामंदिर या ठिकाणी संपन्न झाले. या वेळी रमेश ढोले, दिलीप अहिरे, दिनेश बागवे, सचिन भोईर,अनिश पाटील, संतोष चाटसे, साक्षी कदम दोन्ही शाळांचे शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेऊन मेहनतीने भाषा शिका, भाषेतून करिअर घडविता येऊ शकते.
– लक्ष्मण ढेबे, मुख्याध्यापक