मटका माफिया गजाआड

18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; मटका किंग पांडू म्हात्रेसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल

| रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।

मटका जुगारासह अवैध धंदे चालवणाऱ्यास बंदी असतानाही शिरवली मध्ये एका घरात राजरोसपणे मटका जुगार चालविला जात होता. रायगड पोलिसांनी शनिवारी (दि.11) रात्री छापा टाकून मटका माफियांना गजाआड केले. 18 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात चारचाकी, दुचाकी वाहनांसह मटका जुगाराच्या साहित्यांचा समावेश असून मटका किंग पांडूरंग म्हात्रे यांच्यासह14 जणांविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आणखी 80 जणांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. मटका जुगाराची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग – रेवस मार्गावरील शिरवली येथे जिम्मी होम नावाचे घर आहे. या अलिशान घरात खुलेआमपणे कल्याण मेन नावाचा मटका जुगार चालवला जात होता. ही माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. शनिवारी (दि.11) रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास पथकाने छापा टाकला. या छाप्यात मटका जुगार चालवण्यासाठी लागणारे साहित्य व काही मंडळी दिसून आली. या सर्वांना ताब्यात घेऊन 18 लाख 60 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पांडूरंग म्हात्रे, आचल कडवे, जितेंद्र पाटील, राहूल पाटील, जयेश कडवे, विनायक अंबाडे, केतन पाटील, रितेश कडवे, रोशन म्हात्रे, रविंद्र पाटील, अंश पाटील, प्रज्वल पाटील, अलंकार पाटील, अक्षय पाटील या चौदा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण मेन नावाचा मटका जुगारचा धंदा अलिबाग तालूका व परिसरात बेकायदेशीर चालवून ऑनलाईन आणि रोखीत पैसे प्राप्त केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार अमोल हंबीर यांनी तक्रार नोंदवली आहे. पांडूरंग म्हात्रे हा मटका किंग म्हणून ओळखला जात असून, त्याच्या विरोधात यापूर्वी मटका जुगार प्रकरणी अलिबाग, पोयनाड या पोलीस ठाण्यात एकूण नऊ गुन्हे दाखल असून अलंकार पाटील यांच्या विरोधात 2024 मध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version