रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
| अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध मटका जुगारासह सट्टेबाजीवर रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, मटका चालविणार्या माफियांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. कृषीवलच्या दणक्याने पोलिसांनी धडक कारवाई करीत शनिवारी (दि. 22) तब्बल 16 जणांवर कारवाई केली. या कारवाईबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यात अनेक भागात अवैधरित्या मटका जुगार, सट्टा हा धंदा राजरोसपणे सुरु होता. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची आर्थिक लूट होण्याबरोबरच असंख्य कुटुंबं देशोधडीला लागली आहेत. तर, अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होण्याची भीतीदेखील वर्तविण्यात येत आहे. याबाबत कृषीवलने आवाज उठवून ही बाब पोलीस यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, तीन अधिकारी व 18 पोलीस कर्मचारी यांची वेगवेगळी सात पथके तयार करण्यात आली. खाडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने काम सुरु केले. अलिबाग, पोयनाड, पेण याठिकाणी छापे टाकण्यात आले. अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा ठिकाणी मटका सट्टा खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करण्यात आली. रमेश चव्हाण, महेश पाटील, रवींद्र इंगोळे, रुपेश मोरे, गोरख कडवे, कृष्णकांत पाटील, पंढरीनाथ म्हात्रे, परेश म्हात्रे, भावेश म्हात्रे, साहील सहानी, सुयेश पाटील, मिलिंद म्हात्रे, सुजीत म्हात्रे, कृष्णा म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून मटका जुगार खेळण्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली.
त्यानंतर पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अड्ड्यांवर छापा टाकून राजेश कदम, प्रकाश मोकल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारवाईत विनोद देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाईने मटका जुगार चालविणार्या 16 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने अवैध धंदे चालविणार्यांचे धाबे दणाणले आहेत.