क्रिकेटरसिकांची उत्कंठा शिगेला
। अलिबाग । प्रतिनिधी ।
स्व. प्रभाकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यू.व्ही. स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित पीएनपी चषक 2025 या टेनिस क्रिकेट स्पर्धा गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. बुधवारपासून (दि.19) कुरुळ येथील आझाद मैदानात या स्पर्धेचा थरार पाहावयास मिळत आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून, रविवारी 23 फेब्रुवारीला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे कोण ठरणार पीएनपी चषकाचा मानकरी याकडे प्रेक्षकांसह जिल्ह्यातील तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले असून, उत्कंठाही शिगेला पोहोचली आहे.
शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. दुसर्या दिवशी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. तिसर्या दिवशी कुरुळ येथील ग्रामस्थांच्या हस्ते आणि चौथ्या दिवशी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबागमधील नामंकित डॉ. राजेंद्र चांदोरकर, डॉ. गणेश गवळी आणि डॉ. साबू यांच्यासह पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. अलिबाग फोटोग्राफर्स व अलिबागचे कलाकार यांच्यामध्ये चौथ्या दिवसाचा प्रदर्शनीय सामना झाला. त्यात कलाकार संघाने बाजी मारली.
गेल्या चार दिवसांपासून दिवस-रात्र सुरु असलेल्या या स्पर्धेचा थरार पाहण्याचा आनंद प्रेक्षक मनमुरादपणे घेत आहेत. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बक्षिसाची स्पर्धा प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरत आहे. अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यातील 24 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यानंतर विजेत्या संघाला पाच लाख रोख व आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला तीन लाख रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाला दोन लाख रुपये व आकर्षक चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज, गोलंदाज यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. एक चारचाकी, दोन आकर्षक दुचाकी व इतर विविध आकर्षक बक्षिसे या स्पर्धेच्या निमित्ताने देण्यात येणार आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवशी होणार्या सामन्यात पीएनपी चषक 2025 चा मानकरी कोण ठरणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
चारचाकी, दुचाकी कोण मिळवणार?
गेले चार दिवसांपासून सुरु असलेली पीएनपी चषक स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. रविवारी होणार्या अंतिम सामन्यानंतर या स्पर्धेतील मालिकावीरास चारचाकी गाडी, तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांना दुचाकी देऊन गौरविण्यात येणार आहे. एखाद्या स्पर्धेत मालिकावीरास चारचाकी देऊन गौरविण्यात येणारी पीएनपी चषक स्पर्धा रायगडातील पहिलीच स्पर्धा ठरणार आहे. त्यामुळे ही भव्य पारितोषिके कोण पटकाविणार याकडे सार्या क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.