करंजाडेत मविआचे शक्तीप्रदर्शन

रामेश्‍वर आंग्रे यांच्यासह ११ जणांंचे अर्ज
। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल तालुक्यातील करंजाडे ग्रामपंचायतीचे महाविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार रामेश्‍वर आंग्रे यांच्यासह सदस्यपदासाठी ११ उमेदवारांनी गुरुवारी ता.१ रोजी पनवेल पंचायत समिती कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज भरला. यावेळी महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी माजी विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश कडू, रामदास पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्तित होते.

निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष असे चार पक्ष एकत्र आले आहेत. या चारही पक्षांनी एकत्र येत पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूका एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या चारही पक्षाने महाविकास आघाडी स्थापन करून त्या द्वारे निवडणूक लढविली जात आहे. प्रत्येक गावागावात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस (आय), शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असून या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या बळावर व त्यांच्या जनसंपर्कच्या बळावर निवडणूकामध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा विश्‍वास महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना आहे. त्यानुसार करंजाडे ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार रामेश्‍वर आंग्रे यांच्यासह सदस्यपदासाठी 11 उमेदवारांनी गुरुवारी शक्ती प्रदर्शन करीत पनवेल पंचायत समिती कार्यालयात अर्ज भरण्यात आले.

ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज
पनवेल तालुक्याच्या 10 ग्रामपंचायतीच्या निवडणूक येत्या 18 डिसेंबर रोजी पार पडत असून त्या निवडणुकीसाठी शिवसेना (शिवसेना उ ठाकरे) यांच्या उमेदवारांनी निवडणूक अर्ज पंचायत समिती कार्यालय, पनवेल येथे दाखल केले. तालुक्यातील नितलस मध्ये 4, करंजाडे 2, दिघाटी 1, शिरढोण 5, चिंध्रण 2, कानपोली 2, या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांनी रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख बबनदादा पाटील व जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शन वं सहकार्‍याने उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी विश्‍वास पेटकर, शांताराम कुंभारकर, विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे, मा नगरसेवक गणेश कडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुदाम पाटील, काँग्रेस पक्षाचे ए. एस. पाटील, हेमराज म्हात्रे आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रचंड उत्साहात व शक्ती प्रदर्शन करीत शिवसेना उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

Exit mobile version