मयंक म्हात्रेची अविश्वसनीय उडी

5 तास 13 मिनिटात धरमतर जेट्टी ते करंजा जेट्टी 18 किमी अंतर पार


| उरण | प्रतिनिधी|

उरण तालुक्यातील करंजा कोंढरीपाडा येथील दिनेश म्हात्रे यांचे सुपुत्र मयंक दिनेश म्हात्रे (वय 10 वर्ष) याने रविवार 3 डिसेंबर 2023 रोजी पहाटे 4 वाजून 14 मिनिटांनी पेण तालुक्यातील धरमतर खाडीत उडी घेतली. सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी उरण तालुक्यातील करंजा जेट्टीवर पोहोचला. धरमतर जेट्टी ते करंजा जेट्टी हे 18 किलो मीटर अंतर असून हे अंतर मयंक म्हात्रे यांनी केवळ 5 तास 13 मिनिटात पोहून पार केले. विशेष म्हणजे मयंक म्हात्रे याचे वय 10 वर्षे असून त्यांनी हा विक्रम पहिल्यांदाच केला. यापूर्वी त्याने अनेक जिल्हास्तरीय पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेउन नेत्रदिपक यश मिळविले होते. पहिल्यांदाच धरमतर खाडी (पेण तालुका )ते करंजा जेट्टी(उरण तालुका )हे 18 किलोमीटर अंतर मयंकने 5 तास तास 13 मिनिटात पोहून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. मयंक म्हात्रे हा उरण शहरातील सेंट मेरी स्कूल मध्ये इयत्ता 5 वी मध्ये शिकत आहे. त्याचे वडील दिनेश म्हात्रे, आई वीणा दिनेश म्हात्रे, मागर्दशक शिक्षक किशोर पाटील (केगाव दांडा ), कोच हितेश भोईर (करंजा ) यांचे मयंकला नेहमी मार्गदर्शन लाभले आहे.वयाच्या 5 व्या वर्षापासूनच मयंक पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेत आहे. जेएनपीटीचे माजी विश्वस्त भूषण पाटील , सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकूर,संतोष ठाकूर, मच्छींद्र म्हात्रे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी , क्रीडा क्षेत्रातील शिक्षकांनी मयंक म्हात्रे यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version