या राड्याचा अर्थ

शिवसेना ही मुळात एक संघटना म्हणून स्थापन झाली. तो राजकीय पक्ष नव्हता. तिच्या तळातल्या सैनिकांनी राडेबाज असणं हेच अपेक्षित होतं. दक्षिणी लोकांची हॉटेल तोडणे, थिएटरवाल्यांना दम देणे, कंपन्यांमध्ये मालकांना धमकावणे, कामगार संघटनांमधील कम्युनिस्टांना मारणे हे सेनेचे सुरुवातीचे कार्यक्रम होते. मुंबई दंगलीत आपण सहभागी होतो हे तर ते आजही अभिमानाने सांगतात. शिवसेना आता एक प्रतिष्ठित पक्ष असला आणि अलिकडपर्यंत त्याचे प्रमुखच मुख्यमंत्री होते-असले तरी मुळात तिची उभारणी एका टोळीप्रमाणे झाली होती. एकनाथ शिंदे गटाने सत्ता स्थापन केल्यानंतर या पक्षात फूट पडली आणि आता हळूहळू तिच्या तळात असलेला टोळीबाजपणा उघड पडू लागला आहे. अनंतचतुर्दशीच्या दिवशी मुंबईत प्रभादेवीला शिंदे आणि ठाकरे गटात जो राडा झाला ते याचेच निदर्शक आहे. सुदैवाने यावेळी मोठा हिंसाचार झाला नाही. पण भविष्यात तसा भडका कधीही उडू शकतो हे यावेळी स्पष्ट दिसले. शुक्रवारचा प्रकार थोडक्यात आवरला. पण मुंबई महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे असे राडे वाढण्याचा धोका आहे. या निवडणुकीत सेनेला भुईसपाट करा, उद्धव यांना धडा शिकवा असा आदेश अमित शहा देऊन गेले आहेत. त्यानुसार भाजपचे मुंबईतल्या चाणक्यांची डावपेच आखणी सुरू आहे. त्यामध्ये तळाच्या शिवसैनिकांशी लढण्यासाठी शिंदे गटाला सुपारी दिली जाणार हे उघड आहे. शिंदे यांना मुख्यमंत्री केलेले असल्याने तितकी तर भाजपची अपेक्षा असणारच. शिंदे गट उपकाराच्या ओझ्याखाली किती दबून आहे हे मुख्यमंत्री ज्या रीतीने अमित शहांच्या स्वागताला गेले त्यावरून दिसलेच. त्यामुळे आता सरवणकर इत्यादींनी भाजपला शिकार मिळवून देण्यासाठी थेट आपल्या खांद्यावर बंदूक घ्यावी यात नवल काही नाही. आमदार असलेल्या सदा सरवणकर यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हवेत गोळीबार केल्याचा आरोप आहे. लगोलग खरी शिवसेना काय असते ते दाखवून देऊ असा इशारा अरविंद सावंत यांनी दिला. म्हणजे पुढच्या वेळी कदाचित यांच्या बाजूने काही शस्त्रे निघतील. सेनेने आजवर आपल्या विरोधकांविरुद्ध वापरलेली ही राड्याची तंत्रे आता आपसात वापरली जातील. यादव कुळातले वीर एकमेकांच्या जिवावर उठले आणि नष्ट झाले, जे की साक्षात श्रीकृष्णालाही थांबवता आले नव्हते. सेनेतील भांडणही याच दिशेने निघाले आहे असेच कोणालाही वाटेल. पण हा प्रश्‍न केवळ सेनेपुरता मर्यादित नाही. मुंबई ही खरी कोणाची, कष्टकर्‍यांची की संपत्तीवाल्यांची इतका तो व्यापक आहे. सेनेचे मूळ स्वरुप वर म्हटल्याप्रमाणे असले तरी काळाच्या ओघात ती मुंबईतील मराठी लोककारणाचा आणि सामान्य लोकांच्या राजकारणाचा चेहरा बनली होती. सामान्य घरांमधून आणि कनिष्ठ जात व वर्गांमधून आलेली मुले या संघटनेत सहज पदे भूषवू शकत होती. त्यातूनच कालपर्यंत पानाची टपरी चालवणारे आणि रिक्षावाले कुठच्या कुठे गेले. सेनेचे हे मोठे सामर्थ्य होते. त्यातून मुंबईच्या सत्तास्थानांवर सामान्य माणसाचा दबाव निर्माण झाला होता. मुंबईत पाय रोवण्यासाठी भाजपला सेनेची मदत घ्यावी लागली. उच्च मध्यमवर्गीय, गुजराती-मारवाडी व्यापारी आणि बिल्डर इत्यादींनी भाजपला पूर्वापार आश्रय दिला. पण मतांसाठी ते पुरेसे नव्हते. सेनेचा मराठी टक्का गरजेचा होता. आता हा टक्का पार घसरला आहे. सर्वच क्षेत्रात उत्तर भारतीय, गुजराती यांचा वरचष्मा वाढला आहे. मुंबईवर कबजा करण्याचे त्यांचे स्वप्न भाजपच्या मार्फत पुरे होऊ शकणार असल्याने ते त्या पक्षाच्या मागे एकवटले आहेत. सामान्य माणसाचा मुंबईवर असलेला दबाव नष्ट होतो आहे हे 2019 मधील बेस्टच्या संपाच्या वेळी दिसले होते. हा संप प्रदीर्घ काळ चालला व शेवटी तो बारगळला. या नव्या काळातला नव्या मुंबईत, सामान्य माणसाचं वाहन असलेल्या बेस्ट वाहतुकीची आबाळ केली तरी फरक पडत नाही असा स्पष्ट संदेश त्यातून गेला. यापुढच्या काळात याच पद्धतीच्या राजकारणाला आता बहर येणार आहे. मात्र ते होण्यासाठी मुंबईतील उरलेसुरले मराठी लोककारण नष्ट होण्याची गरज आहे. प्रभादेवीतला गोळीबार ही त्याचीच चुणूक होती.      

Exit mobile version