मधमाशी होत आहे दुर्मिळ
। पाताळगंगा । काशिनाथ जाधव ।
पूर्वी घनदाट जंगलांमुळे अनेक प्रकराची जंगली फुले निर्माण होत असे. यामुळे अशा जंगलात मधमाशी मोठ्या प्रमाणात वास्तव्य करीत असल्यामूळे गावरान मध हे मोठ्या प्रमाणात मिळत असे; मात्र आज विविध प्रदुषणामूळे मधमाशी दुर्मिळ होत असल्याने औषधी मधाचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याची वस्तूस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
आज जंगले नामशेष होत चालली असल्यामुळे तसेच सिमेंटच्या जंगलामुळे अनेक वृक्षांची कत्तल होत आसताना जंगलातील वनस्पती नष्ट होत आहे. त्याचबरोबर जंगलात वणवे मोठ्या प्रमाणात लागत असल्याने मधाच्या पोळ्यांबरोबर मधमाशी या वणव्याच्या संकटात अडकल्याने मृत्यू पावत आहेत. यामुळे या माशांनी आपला मोर्चा गावाच्या वस्तीकडे वळविला. मात्र त्यास कृत्रिमरित्या फवारणी करून त्यांचा नाश केला जात आहे. यामुळे सहजिकच मधमाशीची संख्या घटत आहे.
विविध औषधी गुण असलेलं मधमाशांचं पोळे सध्याच्या हायटेक युगामुळे दुर्मिळ होत चालले आहे. तर ग्रामीण भागामध्ये मधमाशांचे पोळे लुटून नेणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मधमाशांचे पोळे हे सध्या नामशेष होत आहे. सर्दी, खोकला, पोटशुळ आदी आजारांमध्ये मधाचा वापर केला जातो. आयुर्वेदामधील आणि होमिओपॅथीची औषधे बनविण्यासाठी मधाचा वापर मोठय प्रमाणात केला जातो. परंतु शेतामध्ये पिकांवर रासायनिक फवारण्यांचे प्रमाण वाढत चालल्यामुळे मधमाशांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे गावरान मध सध्या दुर्मिळ होत चालले आहे.