शेकापच्या तालुकानिहाय दौऱ्याला सुरूवात
| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा रायगड जिल्हा तालुकानिहाय दौरा मंगळवारी (दि.6) सुधागड-पाली येथून सुरू झाला. यावेळी स्मार्ट मीटर विरोधी मोर्चा, मतदार यादी पुनरिक्षण आणि पक्ष संघटना या विषयांवर जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांच्या अध्यक्षतेखाली पाली येथील निवासस्थानी गाठीभेटी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, या कर्जबाजारी महाराष्ट्राने 2 हजाराचा स्मार्ट मीटर 12 हजार रुपयाला विकत घेतला आहे. तसेच, या मिटरमुळे महावितरणमधील 25 हजार तरुणांच्या नोकऱ्या जाणार आहेत. त्यामुळे हा लढा आम्ही तीन टप्प्यात लढणार आहोत. तसेच, दुसरा विषय मतदार नोंदणीचा असून, काही मतदार जाणीवपूर्वक वगळले जात आहेत. 2004 ला नाव होते, पण आता पुरावा नाही म्हणून नोटिसा बजावल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर जिल्हा चिटणीस सुरेश खैरे म्हणाले, एक महिन्यापूर्वी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या उपस्थितीत स्मार्टमीटर बाबत बैठक पार पडली. या बैठकीत “वीज बिल भरमसाठ येत असून, स्मार्ट मीटरची सक्ती केली जात आहे,” असा विषय मांडला गेला. गावोगावी अदानीची मंडळी सक्तीने मीटर बदलत आहेत. तसेच, या स्मार्ट मीटरमुळे आधी 300-500 येणारे बिल आता 1500 ते 3000 येत आहे. भाजपशासित इतर राज्यांनी विरोध करून हे टेंडर पास होऊ दिले नाही, मात्र महाराष्ट्रात 12 हजार रुपये प्रती मीटरप्रमाणे कोट्यवधींचे टेंडर अदानीला दिले. प्रत्यक्षात 1500 रुपयांच्या मीटरसाठी 12 हजार मोजले जात आहेत. 60 टक्के अनुदान केंद्र तर 40 टक्के कर्ज राज्य सरकार घेऊन अदानीला देणार असून, ते कर्ज जनतेच्या बिलातून वसूल केले जाणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आम्ही तालुकानिहाय बैठका घेत आहोत. दुसऱ्या टप्प्यात शेकाप सरचिटणीस जयंत पाटील व माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या सभा आणि तिसऱ्या टप्प्यात अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर एक लाखांचा मोर्चा काढणार आहोत, असेही खैरे म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, राज्य कामगार आघाडीचे प्रदीप नाईक, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम, अलिबाग महिला आघाडी अध्यक्ष हेमाडे, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य किसनराव उमटे, तालुका चिटणीस अतिश सागळे, तालुका सहचिटणीस प्रवीण कुंभार, महेश जाधव, जनार्दन जोशी, सुधीर साखरले, महिला आघाडीच्या समृद्धी यादव, माजी सभापती शेळके, विविध पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
