उद्या ‘आघाडी’च्या सभांचा धडाका

शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील यांची उपस्थिती

। अलिबाग । प्रतिनिधी ।

महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 28) रोहा आणि श्रीवर्धन व पोलादपूरमध्ये इंडिया आघाडीची सभा आयोजित केली आहे. तालुक्यातील शेकापसह इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन तालुका चिटणीस यांच्याकडून करण्यात आले आहे.

रायगड लोकसभा मतदार संघातील निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या सात मे रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान होणार आहे. मतदानासाठी दहा दिवस तर प्रचारासाठी अवघे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रचाराचा वेगदेखील दिवसेंदिवस वाढत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

रायगड जिल्ह्यातील रोहा, श्रीवर्धन व पोलादपूर तालुक्यात रविवारी (दि.28) इंडिया आघाडीच्यावतीने सभा आयोजित केली आहे. पोलादपूरमधील चोळई येथे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही सभा होणार आहे. यावेळी शेकाप नेते आ.जयंत पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शन असणार आहे. यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड.आस्वाद पाटील, महाडच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप, शेकाप महाड विधानसभा चिटणीस एकनाथ गायकवाड, जगन्नाथ वाडकर, शेकाप पोलादपूर तालुका चिटणीस वैभव चांदे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. रोहा तालुक्यातील चणेरा येथे रविवारी (दि.28) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सभा होणार आहे. तसेच, श्रीवर्धन येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version