बाळाराम पाटील यांच्यासह प्रकल्पग्रस्तांचा पाठपुरावा; 13 वर्षांच्या संघर्षानंतर न्यायाची अपेक्षा
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
गेल्या 13 वर्षांपासून नैना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत नैना प्रकल्पग्रस्त उत्कर्ष समिती पनवेलच्यावतीन रविवारी (दि.25) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली. यावेळी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्री यांनी स्वीकारून प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समितीच्यावतीने देण्यात आली आहे.
या निवेदनातून नैना प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी, हक्क आणि भवितव्याशी संबंधित विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यात आले. गेल्या 13 वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करीत आहेत. या प्रश्नांची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन प्रकल्पग्रस्तांना दिलासा द्यावा आणि त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले आणि खासदार श्रीरंग बारणे यांनाही निवेदन सादर करून प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. यावेळी शासनस्तरावर बैठक होऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह काशीनाथ पाटील, वामन शेळके, तालुका चिटणीस राजेश केणी, सभापती देवेंद्र मढवी, मनीषा चोरघे, नंदकुमार पाटील व शेखर शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, नैना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याचे दिलेले आश्वासन महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र, केवळ बैठक न होता शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय घेऊन त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची भूमिका समितीच्यावतीने स्पष्ट करण्यात आली.
