वावेमधील रायगड रॉयल रायडर्स ग्रुपचा उपक्रम
। अलिबाग । प्रतिनिधी ।
वाढत्या प्रदुषणामुळे आरोग्य धोक्यात येण्याची भिती निर्माण झाली आहे. अलिबाग तालुक्यातील वावे येथील रायगड रॉयल रायडर्स ग्रुपने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घेत दुचाकी रॅलीतून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याचे काम केले आहे. अलिबाग तालुक्यातील वावे ते लोणावळ्यापर्यंत रॅली काढून झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश गावागावात पोहचविण्याचा प्रयत्न केला.
वावे येथील रायगड रॉयल रायडर्स ग्रुप गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. 25 वर्षापासून 50 वर्षापर्यंतची मंडळी या ग्रुपमध्ये कार्यरत आहेत. आपला नोकरी व्यवसाय सांभाळत हा ग्रुप वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून जनतेमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आली आहे. दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकीवर जाऊन तेथील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याबरोबरच शिक्षणाचे महत्व तसेच मुलगी शिकली प्रगती झाली, पाणी वाचवा हा संदेश पोहचवण्याचा प्रयत्न करीत आले आहेत. यावर्षी देखील ग्रामीण भागातील वावे येथील रायगड रॉयल रायडर्स ग्रुपने बांधिलकी जपत वावे ते लोणावळा पवना लेक राईडपर्यंत दुचाकीवर प्रवास केला. हेल्मेट घालून त्यांनी हा प्रवास केला असताना ताम्हिणी घाटात होत असलेले अपघात रोखण्यासाठी दुचाकीवर प्रवास करताना हेल्मेट वापरा हा संदेश पोहचविण्याचे काम केले. तसेच सिमेंटच्या जंगलात वावरत असताना पर्यावरणाचा समतोल बिघडू लागला आहे. झाडांची बेसुमार कत्तल केली जात आहे. त्यामुळे या ग्रुपने पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश पोहचविण्याचा प्रयत्न या रॅलीतून केला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील आम्ही मंडळी गेल्या अनेक वर्षापासून दुचाकी रॅली काढत आहोत. ही रॅली काढण्याचा उद्देश म्हणजे समाजात अंधश्रध्दा निर्मूलन, शिक्षण, व इतर उपक्रमांबाबत जनजागृती करून नागरिकांना जागरूक करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
गितेश पाटील
रायगड रॉयल रायडर्स