। रायगड । प्रतिनिधी ।
खरीप हंगामात जिल्ह्यात भात हे महत्त्वाचे पीक असून, शेतकर्यांचे उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकर्यांनी आपल्या शेतात कडवा वाल, चवळी आणि हरभरा या कडधान्यवर्गीय पिकांची लागवड केली असून, सद्य:स्थितीत हरभर्याच्या पिकानेदेखील जोम धरला आहे.
खरीप हंगामात भातपीक घेतल्यानंतर शेतकरी प्रामुख्याने वाल, हरभरा, भाजीपाला ही पिके घेतात. पाण्याची सोय नसलेल्या ठिकाणी जमिनीच्या ओलितावर ही पिके घेण्यात येत असल्याने खूप मेहनत व खर्च न करता उत्पन्न मिळणारी ही पिके आहेत. द्विदलवर्गीय कडधान्य पिके घेतल्यामुळे हवेतील नत्र जमिनीत स्थिरीकरण होऊन पुढील पिकाला त्याचा फायदा होतो व रब्बी हंगामातील पीक उत्पादन वाढून हवेतील नत्र पुढील पिकाला मिळते. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी संशोधन केंद्र रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विभागाचे अधिकारी शेतकर्यांच्या प्रक्षेत्रावर जाऊन लागवड करण्यात आलेल्या हरभरा पिकाविषयी सातत्याने मार्गदर्शन करीत आहेत.