| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चौल गावाला निसर्गाचे वरदान लाभले असून वावे रस्त्यावरील गायचोळे भागात टेकडीवर हिंगुलजा देवीचे मंदिर आहे. सिंधु संस्कृतीचे श्रद्धास्थान असलेल्या या पर्यटनस्थळाला सध्या भाविक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. या वर्षी 13 जानेवारीला मंदिर परिसरात यात्रा भरणार आहे.हिंदू संस्कृती दक्षिणेकडे विस्तारित झाल्यावर या देवतेची त्या त्या भागात मंदिरे उभारल्याचे दिसून येत आहे. त्यापैकी चौलचे एक हिंगुलजा मातेचे मंदिर. सुमारे दोनशे पायर्या चढून गेल्यावर मंदिराची भव्यता लक्षात येते.भन्साळी समाज दहाव्या शतकात चौलच्या बंदरात व्यवसायानिमित्त आले व त्यांनी हिंगुलजा देवीला आपली कुलदेवता मानली. या समाजाची अनेक कुटुंबे जरी मुंबईत राहत असली तरी पौष पौर्णिमेला न चुकता दर्शनासाठी येतात. देवीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. अगदी परशुरामापासून ते श्रीरामापर्यंत अनेकांशी या कथा निगडित आहेत. रावणवधानंतर श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्यासमवेत देवीचे दर्शन घेतल्याची आख्यायिका आहे. गुजरात व राजस्थान राज्यात हिंगुलजा मातेची मंदिरे असून शक्तिपीठ असलेली ही देवी अनेक नावांनी ओळखली जाते.