सिडकोची वर्षभरात दमदार कारवाई; 165 जणांना करण्यात आली अटक
। पनवेल। प्रतिनिधी ।
सिडकोच्या जागेवर मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानिकारक असलेले डेब्रिज टाकणार्या तसेच मातीचे उत्खनन करून त्याची चोरी करणार्यांविरोधात सिडकोने गत वर्षभरात कारवाई करून 56 गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये 165 आरोपींना अटक करून 150 ट्रक, डम्पर व तीन जेसीबी आणि पोकलेन जप्त केले आहे.
मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. या कामाच्या ठिकाणावरून निघणारे मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानिकारक असलेले डेब्रिज काही व्यक्तींकडून सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जागेमध्ये तसेच त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनधिकृतपणे टाकण्यात येत आहे. काही व्यक्तींकडून मातीचे उत्खनन करून त्याचीदेखील चोरी करण्यात येते. या प्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार सिडकोच्या अभियांत्रिकी विभागाचे अभियंते, अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक, अधिकारी व अभियंते, सुरक्षा अधिकारी व सुरक्षारक्षकांच्या पथकाने गत वर्षभरामध्ये मोहीम राबवून संपादित केलेल्या जागेवर डेब्रिज टाकणार्यांविरोधात धडक कारवाई केली.
56 गुन्हे दाखल
विशेष मोहिमेदरम्यान सिडकोच्या जागेवर अनधिकृत डेब्रिज टाकणार्यांविरोधात विविध पोलिस ठाण्यांत 56 गुन्हे दाखल करून 165 आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवायांमध्ये 150 ट्रक-डम्पर, तीन जेसीबी, पोकलेन आदी वाहनेदेखील जप्त करण्यात आली आहेत.
सिडकोच्या परिक्षेत्रात विकासकामे प्रगतिपथावर असून, सिडको परिसरात मानवी आरोग्यास हानिकारक अशा प्रकारचा कचरा, बांधकामाचा राडारोडा, उत्खननातील दगडमाती टाकण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कोणी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याबद्दल www.cidco.maharashrta.gov.in या वेबसाईटवर तसेच संबंधित पोलिस ठाण्यास माहिती द्यावी.
सुरेश मेंगडे,
मुख्य दक्षता अधिकारी, सिडको.