नक्षल संदेश

नक्षलवाद्यांचा निःपात करण्याचे आजवर बरेच प्रयत्न झाले. चिदंबरम गृहमंत्री असतानाच्या काळात नक्षलवाद हा देशाला सर्वात मोठा धोका आहे असं काँग्रेस सरकारनं जाहीर केलं होतं. आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र  या राज्यातील विविध पक्षांच्या सरकारांनी नक्षलवाद्यांचा कणा मोडण्याचे प्रयत्न केले. त्यात ते पुष्कळ यशस्वी झाले. मात्र छत्तीसगडच्या जंगलातील नक्षलवाद संपलेला नाही. आधीच्या भाजप आणि आताचे काँग्रेसचे सरकार त्यापुढे हतबल असल्याचे दिसले आहे. अर्थात नक्षलवादी असे हल्ले करून नेमके काय साध्य करतात हे कोडे आहे. गरीब, आदिवासींसाठीची त्यांचा लढा आणि आक्रमक डावी वैचारिक भूमिका यामुळे नक्षलवाद्यांबद्दल एके काळी अनेकांना आकर्षण वाटत असे. पण मनात आले की कराव्या तशा हल्ल्यांमुळे गरिबांचे कोणतेही राजकारण पुढे जात नसते. त्यामुळे जंगलाबाहेरच्या जगात असलेली नक्षलवाद्यांबाबतची सहानुभूतीही संपली आहे. ही तथाकथित चळवळ आता सर्व दृष्टीने एकटी पडली आहे. त्या नैराश्यातूनच अधूनमधून आपल्या अस्तित्वाची बहुधा जाणीव करून देत असतात. छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये बुधवारी घडवलेला स्फोट हे त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. नक्षलवाद्यांना हुलकावणी देण्यासाठी पोलिसांनी खासगी वाहनाचा वापर केला. पण तरीही त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला व त्यात दहा पोलिस जवान ठार झाले. विशेष म्हणजे काल सकाळी एका गावात याच पथकाची चकमक झाली होती व त्यांनी दोन संशयित नक्षलवाद्यांना ताब्यात घेतले होते. ही मोहिम संपवून परत जातानाच हा हल्ला करण्यात आला. एकीकडे नक्षलवाद्यांना पैसा, शस्त्रास्रे इत्यादींचा पुरवठा रोखण्यात आपल्याला यश आल्याचा दावा पोलिस करीत असतात. दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2021 मध्ये सुकमा इथं केलेल्या हल्ल्यात 22 जवान ठार झाले होते. त्यानंतर नक्षलवादी कारवायांवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश आले होते. पण गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये 32 माओवादी ठार झाले आणि 408 जण शरण आले. 279 जणांना अटक करण्यात आली. आधी वर्षभरात किमान शंभर-दीडशे वेळा नक्षलवाद्यांशी चकमकी होत असत. त्याही कमी झाल्या. यावरून नक्षलवाद्यांकडची सामग्री मर्यादित होत आहे हे खरे असावे. मात्र कालचा हल्ला ज्या रीतीने झाला त्यावरून त्यांची मारक क्षमता अजूनही कायम आहे. या हल्ल्यात सुमारे चाळीस ते पन्नास किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. ती जमिनीखाली पाच-सहा फूट खाली खोदून त्यात ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे प्रत्यक्ष स्फोट दूरवरून किंवा रिमोट यंत्रणेद्वारे करण्यात आला. जमिनीच्या खाली स्फोटके लपवणे आणि पोलिसांच्या मार्गावर लक्ष ठेवून अचूक स्फोट करणे हे ज्यांना शक्य आहे त्या नक्षली टोळ्यांच्या ताकदीचा कोणालाही अंदाज करता येऊ शकेल. विशेष म्हणजे दर पावसाळ्यापूर्वी या भागात नक्षलवादी किमान एक तरी मोठा हल्ला घडवतात. स्थानिकांचा पाठिंबा असल्याखेरीज अर्थातच हे घडत नाही. त्यामुळे छत्तीसगड सरकारला आव्हानाचा मुकाबला करावा लागणार आहे.

Exit mobile version