गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून निर्णयाची अंमलबजावणी
| मुंबई | प्रतिनिधी |
मराठी भाषेचा राज्यात योग्य सन्मान राखला जावा यासाठी मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर अर्थात गुढीपाडव्यापासून सर्व व्यावसायिक वाहनांवरील संदेश आता मराठीतच लिहिलेले असावेत, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. गुढीपाडव्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता व्यावसायिक ट्रक, ट्रॅव्हल्स या वाहनांवर लिहिलेले संदेश मराठीतच असणं बंधनकारक असणार आहे. याबाबत आरटीओला सूचना देण्यात आल्या आहेत.
मराठी भाषा, राज्यातील मायबोलीला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देत, मागील अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण केली. आता येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होत आहे. या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश हे मराठीत असले पाहिजेत, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्याची मराठी ही अधिकृत राज्य भाषा आहे. महाराष्ट्रातील नागरिक हे प्रामुख्याने मराठी भाषिक आहेत. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. सहाजिकच मराठी भाषेचे संवर्धन करणं, ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. त्याचाच एक भाग म्हणून व्यावसायिक वाहनांवर लिहिलेले संदेश हे मराठीतच असावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
मराठीच्या प्रचार, प्रसारास मदत
राज्यात नोंदणी असलेल्या अनेक व्यावसायिक वाहनांवर लिहिलेले सामाजिक संदेश, जाहिरात आणि प्रबोधनात्मक माहिती हिंदीत किंवा इतर भाषांमध्ये लिहिलेली असतात. (उदा. बेटी बचाव, बेटी पढाव) त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारवर बंधनं येतात. मात्र, यंदाच्या गुढीपाडव्यापासून असे सामाजिक संदेश, जाहिरात आणि प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत प्रदर्शित केल्यास (उदा. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा) महाराष्ट्रातील जनतेला अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होईल.
परिवहन आयुक्तांना निर्देश
येत्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत असलेल्या सर्व व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश तसंच इतर महत्त्वाच्या जाहिराती आणि प्रबोधनात्मक माहिती ही मराठी भाषेत लिहिण्याची अंमलबजावणी सुरू करावी, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्त यांना दिले आहेत.