| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्रावर सध्या एक मोठं संकट घोंघावत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मेथी चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला देखील बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान, आता महाराष्ट्रावर सध्या एक मोठे संकट घोंघावत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मेथी चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीलादेखील बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, तर अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर तीव्र दाबात होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. कोकणातच नव्हे तर मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
दुसरीकडे समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा फटका हा आता गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्याला बसला आहे. गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर जोरदार वादळाला सुरुवात झाली आहे. गणपतीपुळ्यातील समुद्र चांगलाच खावळला असून उंच लाटा याठिकाणी पहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी किनाऱ्यावरील पर्याटकांना बाहेर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती असून, सध्या रत्नागिरीसह आजूबाजूच्या परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे.







