नागोठण्यात एमआयडीसीची जलवाहिनी फुटली

। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे शहराला पाणी पुरवठा करणारी एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी नागोठण्याजवळच असलेल्या वरवठणे गावाच्या हद्दीतील शेतात सोमवारी (दि.29) पहाटेच्या सुमारास फुटली आहे. ही जलवाहिनी फुटल्याने नागोठण्याच्या काही भागातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे या जलवाहिनीवर अवलंबून असलेल्या नागरिकांना विशेष करुन महिलांना पाण्यासाठी विहीरींवर व इतर ठिकाणी जावे लागले. नागोठणे शहराला पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची ही मुख्य जलवाहिनी वरवठणे गावाच्या हद्दीतील शेतकर्‍यांच्या शेतामधून आली आहे. यापूर्वीही ही जलवाहिनी अनेकवेळा फुटल्याने नागोठण्यातील पाणीपुरवठा बंद झाला होता. या जलवाहिनीची नागोठणे ग्रामपंचायतीकडून वारंवार दुरूस्ती करण्यात आली आहे. याआधीही एक वेळेस या जलवाहिनीचे सहा ते सात पाईप बदलण्यात आल्याने आता हा प्रश्‍न कायमचा मार्गी लागल्याचे वाटले होते. मात्र पुन्हा एकदा ही जलवाहिनी एका नवीन ठिकाणीच फुटल्याचे दिसून आले आहे. दरम्यान नागोठणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करुन नागोठण्यातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करण्यात येईल, असा विश्‍वास नागोठण्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी व्यक्तकेला आहे.

Exit mobile version