| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्यात पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 143 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी दुपारपर्यंत कुंडलिकेने इशारा पातळी ओलांडली होती. संभाव्य पूरसदृष्य पुरस्थिती आणि दरड पडण्याच्या घटनेमुळे जिल्ह्यातील दोन हजार 157 कुटूंबातील तब्बल सात हजार 469 नागरिकांचे स्थलांतर करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. जिल्ह्यात एनडीआरएफचे एक पथक तैनात करण्यात आले आहे.आंबा,कुंडलिका,पाताळगंगेने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली असल्याने प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे.
रायगड जिल्ह्याला सातत्याने रेड अलर्ट देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. जिल्हा प्रशासनाचा नियंत्रण कक्ष हा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गजबजलेला असल्याचे चित्र दिसून येते. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. नदी, खाडी किनारी असणारे, तसेच डोंगरभागात राहणारे नागरिक भितीच्या सावटाखाली राहत आहेत. महाड तालुक्यातील नागरिक देखील रात्र जागून काढत आहेत. महाबळेश्र्वर, रायगड मध्ये जोरदार पाऊल सुरु झाला आणि त्याच्या जोडीला जरका समुद्राल उधाण आले तर सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकत आहे. खबरदारीची उपाय योजना म्हणून जिल्ह्यातील दोन हजार 157 कुटूंबातील तब्बल सात हजार 469 नागरिकांचे स्थलांतर आतापर्यंत करण्यात आले आहे. काही नागरिक हे त्यांच्या नातेवाईकांकडे गेले आहेत, तर काहींना निवारा कॅम्पमध्ये पाठवण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात पावसाचा कहर भयंकर असल्याने मुक्या जनावरांना देखील आपला जीव गमवावा लागला आहे. मुरुड, पोलादपूर, खालापूर, सुधागड-पाली, पनवेल आणि माणगाव येथे एकूण 73 मोठी जनवारे (गाय-बैल-म्हैस) मृत पावली आहेत. तर लहान जनावरांची संख्या 52 आहे. तर 453 कोंबड्या देखील मृत पावल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे म्हसळा, तळा, महाड, खालापूर आणि अलिबाग तालुक्यातील 13 सार्वजनिक मालमत्तेचे अशंतः तसेच 4 पूर्णतः नुकसान झाले आहे. त्यामध्ये समाज मंदिर, बुध्द विहार, स्मशानभूमीचा समावेश आहे.
पनवेल, तळा, पेण खालपूर येथे 16 पक्की घरे पडली आहेत. तर 46 कच्च्या घरांचे नुकसान झाले आहे. 250 अशंतः पक्की घरे, तर 127 अंशतः कच्ची घरे पडली आहेत. मुरुड तालुक्यात एका पोल्ट्री शेडचे नुकसान झाले आहे, तर पनवेल, माणगाव, तळा, पोलादपूर, पेण. म्हसळा, मुरुड, उरण, कर्जत, खालापूर, सुधागड, आणि महाड या 12 तालुक्यातील 32 गुरांचे गोठे कोसळले आहेत.