। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे दरवाजे एमआयएमसाठी कदापि उघडले जाणार नसून, अशा प्रकारे चर्चा घडवून आणण्याचा हा सर्व एमआयएमचा कट असून, तो उधळून लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
महाविकास आघाडीत एमआयएमच्या युतीबाबतच्या प्रस्तावानंतर विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, त्यावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाष्य करत हा कट असून तो उधळून लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. विरोधक विरोध करत राहणार पण तितक्याच ताकदीने आता आपण प्रत्युत्तर दिले पाहिजे असेही ठाकरे यावेळी सांगितले.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासंदर्भात खासदार, संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांशी सेनाभवन येथे ऑनलाईन संपर्क साधला त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी खासदारांना वरील सूचना केल्या आहेत. यावेळी ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
सध्या शिवसेनेला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू असून विरोधक काय खुरापती करत आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री