बोरघाटात मिनीबस जळून खाक

15 प्रवासी बचावले; खोपोली बायपासजवळ शॉर्टसर्किटमुळे आग

| खालापूर | प्रतिनिधी |

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील खोपोली बायपासजवळ मिनी बसला अचानक आग लागून बस जळून खाक झाली. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 15 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून 15 प्रवाशांना घेऊन मिनी बस द्रुतगती महामार्ग आणि मिसिंग लिंक मार्गे पुण्याच्या दिशेने जात होती. बोरघाटातील खोपोली बायपासजवळ बस आली असता इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून चालक योगेश याने तातडीने बस महामार्गाच्या बाजूला घेतली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपण्ो खाली उतरवले. त्यानंतर बोरघाट पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच बोरघाट व खोपोली पोलीस, आयआरबी कंट्रोलचे फायर रेस्क्यू पथक, हेल्प फाऊंडेशनचे कर्मचारी आणि खोपोली नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही वेळातच संपूर्ण बस जळून खाक झाली.

दरम्यान, सर्व 15 प्रवाशांना अन्य खासगी बसमधून पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Exit mobile version