श्रीवर्धनमध्ये मायनिंग माफियांचा सुळसुळाट

बेकायदेशीर ओव्हरलोड वाहतुकीचा कहर; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुक्यात राजकीय दलालांच्या वरदहस्तामुळे अनेक ठिकाणी सुरु असलेल्या कथित बेकायदेशीर खाणकामाने भीषण स्वरूप धारण केले आहे. विशेषतः गडबवाडी व करिवणे परिसरातील खाणीतून गालसूरमार्गे बोर्ली ते दिघी या मुख्य रस्त्यावरून ओव्हरलोड डंपरची अविरत वाहतूक सुरू असून स्थानिक नागरिकांचे जीवन अक्षरशः वेठीस धरले गेले आहे. येथील रस्त्यांची दुरवस्था, वाढते अपघात, धुळीचे प्रदूषण, शेतीचे नुकसान आणि प्रशासनाचे कथित दुर्लक्ष यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

श्रीवर्धनमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशी खाणकाम सुरू आहेत. त्याला राजकीय दलालांचा वरदहस्त असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा जिव धोक्यात आला आहे. गडबवाडी व करिवणे परिसरातील खाणीतून गालसूरमार्गे बोर्ली ते दिघी या मार्गावर डंपरची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्यामुळे येथील डांबरीकरण पूर्णपणे उखडले गेले असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही भागात रस्ता खचला आहे. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धुळीचे ढग यामुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वार वारंवार घसरून पडत असल्याच्या घटना घडत आहेत. तसेच, ओव्हरलोड डंपर चढाव चढताना अडकल्याने रस्त्याच्या कडेला माती टाकून कृत्रिम चढ तयार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे रस्ता अधिक अरुंद झाला असून मातीचे ढिगारे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले जात असून सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

रात्री उशिरापर्यंत डंपरची वाहतूक सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वेगमर्यादा पाळली जात नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. काही वाहनांच्या नंबर प्लेट अस्पष्ट असल्याचाही आरोप आहे. त्यामुळे शाळकरी मुले, रुग्णवाहिका आणि शेतकरी अडचणीत आले आहेत. शाळकरी मुलांना धोकादायक वाहतुकीतून प्रवास करावा लागत आहे. रुग्णवाहिकांना वेळेत मार्ग मिळत नसल्याने जीवितास धोका निर्माण होत आहे. धुळीमुळे पिकांवर थर बसून उत्पादन घटत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच, विहिरी व पाण्याचे स्रोत गाळाने दूषित होत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. त्याचबरोबर जड वाहनांच्या कंपनांमुळे रस्त्यालगतच्या घरांना तडे जात असल्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. तसेच, सतत उडणाऱ्या धुळीमुळे दमा, खोकला, ॲलर्जी यांसारख्या आजारांत वाढ झाल्याने वृद्ध आणि लहान मुले विशेषतः त्रस्त आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

वारंवार तक्रारी, निवेदने आणि बातम्या प्रसिद्ध होऊनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण आहे. मायनिंग माफियांना नेमके कोण पाठीशी घालत आहे? पोलीस यंत्रणा या प्रश्नावर गप्प का? जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष का? सामान्य जनतेचा वाली कोण? असे संतप्त सवाल करत पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. नागरिकांचा आरोप आहे की, संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याने संगनमताचा संशय अधिक बळावत आहे.

ग्रामस्थांचा इशारा
मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. ग्रामस्थांनी, अवैध व ओव्हरलोड वाहतूक तात्काळ बंद करावी, कायमस्वरूपी तपासणी नाके उभारावेत, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, धुळीवर नियंत्रणासाठी नियमित पाणी फवारणी करावी इत्यादींची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन, रास्ता रोको आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. शासन, पोलीस प्रशासन आणि जिल्हा यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून या गंभीर प्रश्नावर ठोस पावले उचलणे अत्यावश्यक ठरत आहे. अन्यथा वाढता जनआक्रोश अनावर होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
Exit mobile version