| रायगड | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीस गर्भवती ठेवून तिच्यावर सतत शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार घडकीस आला आहे. ही धक्कादायक घटना पेण तालुक्यातील आदिवासी समाजातील कुटुंबांमध्ये घडली आहे. पीडित मुलगी वयाने अवघी 16 वर्षे 11 महिने, म्हणजेच अल्पवयीन असूनही आरोपी युवकाने तिच्या अज्ञानाचा फायदा घेत तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित दोघेही एकाच परिसरातील असून परिचयातून जवळीक वाढली. आरोपीने मुलीला प्रेमाच्या नात्यात गुंतवून तिच्या मानसिक अपरिपक्वतेचा गैरफायदा घेतला. मंदिरात लग्न केल्याचे भासवून तिला घरी नेले आणि तिच्यावर वारंवार शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकला. या संबंधांमुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आले असता कुटुंबीयांनी मोठा धक्का बसला. सामाजिक दबाव, भीती आणि मानसिक आघातामुळे मुलगी दीर्घकाळ मौनात होती. घटनेची गंभीरता लक्षात घेता पीडितेच्या आईने वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत आरोपीवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. वडखळ पोलीस अधिक तपास करत आहेत.







