पेट्रोल पंपाच्या बिलाच्या रकमेचा अपहार

| पनवेल | वार्ताहर |

पेट्रोल पंपावर मॅनेजर आणि कॅशियर म्हणून काम करणार्‍या राहुल कुमार संतु यादव याने 3 लाख 66 हजार 132 रुपये पेट्रोल पंपाच्या मालकाला न देता त्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वेलकम हॉटेलच्या बाजूला पळस्पे येथे एजी जाजल पेट्रोल पंप आहे. 2012 पासून राहुल कुमार यादव हा डिझेल भरण्याचे काम करत होता. 2019 पासून त्याला असिस्टंट मॅनेजर व कॅशियर म्हणून कामासाठी ठेवले. ऑगस्ट महिन्यात पंकज कुमार पांडे- मॅनेजर हे गावी गेले. यावेळी त्यांचा कारभार राहुल कुमार यांच्याकडे सोपवला. ते पुन्हा कामावर रुजू झाले. यावेळी त्यांचे खातेधारक ग्राहक यांच्याकडे डिझेलच्या बिलाचे पैसे मागितले असता राहुल यादव यांच्याकडे रोख रक्कम दिल्याचे सांगितले. यावेळी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर दुसर्‍या खातेधारकाला बिलाची मागणी केली असता त्याने राहुल कुमार यादव याला पैसे दिल्याचे सांगितले. अशाप्रकारे एकूण तीन लाख 66 हजार 132 रुपये रोख रकमेबाबत राहुलकडे विचारणा केली असता त्याने रक्कम स्वीकारल्याचे कबूल केले. आणि पैसे मुलाच्या दवाखान्यासाठी खर्च केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने पैसे परत देतो असे सांगितले. मात्र पैसे परत दिले नाहीत. त्याला फोन केला असता फोन बंद आला. या प्रकरणी राहुल कुमार संतु यादव (राहणार नांदगाव पनवेल, मुळगाव उत्तर प्रदेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version