| लाहोर | वृत्तसंस्था |
पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू बाबर आझम त्याच्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आहे. त्याला गेल्या काही महिन्यांपासून फारशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. नुकतीच मायदेशात बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतही त्याची अत्यंत खराब कामगिरी झाली. या मालिकेत पाकिस्तानला 2-0 असा पराभवही स्विकारावा लागला.
बाबर आझम या मालिकेत एकही अर्धशतकही करू शकला नाही. त्याला 4 डावात अवघ्या 64 धावाच करता आल्या. त्याने गेल्या 16 कसोटी डावात अर्धशतक केलेलं नाही. त्यामुळे त्याच्यावर सध्या जोरदार टीका होत आहे. अशातच त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात तो एका चाहत्याशी गैरवर्तन केल्यासारखे दिसत आहे. अनेक रिपोर्ट्सने दावा केल्यानुसार हा व्हिडिओ पाकिस्तानमधील देशांतर्गत स्पर्धा चॅम्पियन्स वनडे कप स्पर्धेपूर्वीचा आहे. ही स्पर्धा 12 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत अनेक स्टार पाकिस्तानी खेळाडू सहभागी होणार आहेत. यात बाबर मोहम्मद हॅरिसच्या नेतृत्वात स्टॅलियन्स संघाकडून खेळणार आहे. तो या संघात दाखल देखील झाला आहे. दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये जे दिसत आहे, त्यानुसार एक चाहता बाबरला भेटायला आला. त्यावेळी त्याला त्याच्याबरोबर फोटोही काढायचा होता. फोटो काढताना त्या चाहत्याने बाबरच्या खांद्यावर हात टाकण्याचा प्रयत्नही केला. मात्र बाबरने त्याचा हात झटकला. दरम्यान, बाबरने चाहत्याला दिलेल्या या वागणूकीमुळे त्याच्यावर टीका होत आहे. दरम्यान, पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोहेब मकसूदने चाहत्यांना विनंती केली आहे, की संयम ठेवा आणि बाबर आझमला पाठिंबा द्या. तसेच त्याने बाबरची रोहित शर्माशी तुलना करताना असे ही लिहिले की रोहित शर्माने 35 आंतरराष्ट्रीय शतके वयाच्या 30 व्या वर्षांनंतर केली आहेत. मकसूदच्या या पोस्टवरही विविध प्रतिक्रिया येत आहेत. बाबरला कसोटीत जवळपास 600 हून अधिक दिवस झालेत की त्याने अर्धशतकही केलेले नाही. त्याने गेल्या आठ कसोटी सामन्यात सर्वोत्तम 41 धावांची खेळी केली आहे, जी त्याने गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नला केली होती.