| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यासह देशभरातून परळ येथील केईएम रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याबद्दल राज्याचे कॅबिनेट व मुंबईशहराचे सहपालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांना जाब विचारला. यावेळी रुगालयात केवळ नोंद करण्यासाठी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दोन – तीन तास ताठकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र मंत्री लोढा यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
पुढील आठवड्यापर्यंत रूग्णांना योग्य आणि वेळेत उपचार जर मिळाले नाहीत तर पुन्हा रुग्णालयाचा दौरा करून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही मंत्री लोढा यांनी यावेळी दिला. गेल्या 25 वर्षात मुंबई पालिकेच्या गलथान व ढिसाळ व्यवस्था उभी असून, त्याचा सामान्य जनतेला आजही भुर्दंड बसत असल्याचा आरोप लोढा यांनी केला आहे. या पाहणी दौऱ्या दरम्यान रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या ढिसाळ आणि घोटाळेबाज कारभाराचा पाढाच वाचला. रुग्णांची नोंदणी करणारा विभाग अतिशय अरुंद आहे, त्यात साधे पंखे ही नाहीत. एकाच जागेवर हजारोंच्या संख्येने लोक तिष्ठत बसलेले असतात. जुनी इमारत दोन माळ्यांची तर नवी इमारत 13 माळ्यांची असून, अनेकदा लिफ्ट बंद असते. अशा अवस्थेत रुग्णांना स्वतः संबंधित विभागात घेऊन जावे लागत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
केईएम रुग्णालयात गलथान कारभार
