मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक पुन्हा सुरू

| खोपोली | प्रतिनिधी |

लोणावळा-खोपोली परिसरातील मुसळधार पावसामुळे बंद करण्यात आलेली मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक अखेर सोमवारी रात्री उशिरा वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. दरड हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर एमएसआरडीसी, सुरक्षा अभियंते आणि संबंधित बांधकाम कंपनीने घटनास्थळाची पाहणी करून मार्ग सुरक्षित असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर रात्री दहा वाजता पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

रविवारी झालेल्या विक्रमी पावसाचा मोठा फटका द्रुतगती मार्गाला बसला होता. लोणावळा परिसरात अवघ्या 24 तासांत 625 मिमी, तर खोपोली परिसरात 323 मिमी पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याजवळ दरड कोसळली, तर खालापूर येथील फूड मॉल परिसरात पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने सकाळच्या सत्रात दोन्ही दिशेची वाहतूक विस्कळीत झाली होती. पहाटेच्या सुमारास बोगद्याबाहेरील कमानीलगत मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा ढिगारा कोसळल्याने प्रशासनाने तत्काळ संबंधित मार्गिका बंद केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर महामार्ग प्रशासनाने युद्धपातळीवर दरड हटविण्याचे काम सुरू केले. दिवसभर सुरू असलेली ही मोहीम संध्याकाळपर्यंत पूर्ण करण्यात आली. तांत्रिक तपासणी आणि सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतर वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून सध्या पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेतील केवळ दोनच लेन वाहतुकीसाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. डोंगरावरून अद्याप पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने उर्वरित दोन लेन तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Exit mobile version