‘पॅरिस ऑलिम्पिक’ला भारतीय खेळाडू अधिक जोमाने आणि अत्याधुनिक पद्धतीच्या प्रशिक्षण सोयी-सुविधा तसेच कार्यक्रमांच्या आधाराने सुसज्ज होऊन दाखल होत आहेत. यावेळी भारत सरकारने जेथे पदक मिळण्याची आशा आहे अशा 16 प्रकारांच्या स्पर्धांमध्ये उतरणाऱ्या खेळाडूंच्या तयारीवर तब्बल 470 कोटी रूपये खर्च केले आहेत. यावरून भारत सरकारने ‘मिशन मेडल्स’ची जय्यत तयारी केल्याचे निदर्शनास येत आहे.
अर्थातच या रक्कमेतील सर्वाधिक किंवा मोठा भाग गत ऑलिम्पिकमध्ये भारताला ॲथलेटिक्सचे पहिले वहिले सुवर्णपदक पटकावून देणाऱ्या भालाफेक पटू निरज चोप्रा याच्या वाट्याला आले आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या पूर्वतयारीसाठी निरजला त्याच्या प्रशिक्षक क्लास बोर्टोनिझ यांच्यासह युरोपमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी सराव करण्याची संधी मिळाली आहे. निरजच्या सुवर्णपदकाने भारतीय क्रीडा क्षेत्राला झळाळी आली आहे. क्रीडा मंत्रालयाने ॲथलेटिक्स या खेळासाठी तगडी आर्थिक मदत देऊ केली आहे. भारतीय ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आदील सुमारीवाला जे भारताचे माजी ऑलिम्पियन धावपटू आहेत; ते म्हणत होते. भारतीय भालाफेकपटूंसमोर निरज हा नवा आदर्श निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम असा झाला आहे की, भारताकडे भालाफेकीमध्ये 80 मीटर्सच्या पुढे भालाफेक करू शकणारे तब्बल आठ स्पर्धक आहेत. जगात फक्त हंगेरीचेच एवढे स्पर्धक 80 मीटर्सच्या पुढे भाला फेकणारे आहेत.
मिशन ऑलिम्पिक सेल (साई) किंवा भारतीय क्रीडा मंत्रालयाच्यावतीने चालविली जाणारी टारगेट ऑलिम्पिक पोडीयम योजना असू द्या, या योजनांद्वारे भारताच्या सर्व संभाव्य पदक विजेत्यांना भरघोस मदत मिळत आहे. तिसऱ्या ऑलिम्पिक पदकासाठी यंदा पॅरिसमध्ये दाखल झालेली पी.व्ही. सिंधू किंवा जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेली चिराग-सात्विक जोडी यांना प्रशिक्षक आणि सरावाच्या जोडीदारांसह जगात सर्वत्र प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकाविणाऱ्या मिराबाई चानू हिला अमेरिकेतील सरावासाठी सरकारकडून सहाय्य मिळाले होते. 21 भारतीय नेमबाजांना जर्मनीमध्ये, त्यांच्या परदेशी प्रशिक्षकांसह प्रशिक्षण करण्याची संधी मिळाली आहे. सरावासाठी बुलेट, गन्स आणि अन्य सोयी सुविधाही मिळाल्या आहेत. गेल्या तीन वर्षात कांस्य पदक विजेत्या भारतीय हॉकी संघाला सरावासाठी पुरेसा निधी उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आला आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल 19 वेळा सरावासाठी परदेश दौरे करण्याची संधी हॉकीपटूंना मिळाली आहे.
यावेळी भारत सरकारने जेथे पदक मिळण्याची संधी आहे त्या-त्या खेळासाठी मुक्त हस्ते निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच, ऐन स्पर्धेच्या तोंडावर सरावासाठी परदेशात पाठविले आहे. यावेळी प्रथमच 13 डॉक्टरांचा चमू भारतीय खेळाडूंसोबत असणार आहे. डॉ. पारडीवाला हे त्या डॉक्टरांच्या चमूचे प्रमुख असतील. या चमूमध्ये आहारतज्ज्ञ असून मानसोपचार तज्ज्ञ देखील आहेत. पॅरिस ऑलिम्पिकसाठी दाखल झालेल्या खेळाडूंसाठी सरकारने कोणत्याही प्रकारे आर्थिक तरतूदींसाठी हात आखडता घेतला नाही. ‘मिशन ऑलिम्पिक मेडल’ या ध्येयाने प्रेरित झालेले खेळाडू भारताला अधिक ऑलिम्पिक पदके पटकावून देतील, अशी आशा करण्यास काय हरकत आहे.