तिरंगा अभियानाला संमिश्र प्रतिसाद

| पोलादपूर | वृत्तसंस्था |

तीन दिवस राष्ट्रध्वज तिरंगा फडकविण्याच्या आवाहनानंतर पोलादपूरमध्ये ठिकठिकाणी राष्ट्रध्वज तिरंगा तीस रुपयांना विकले तर काहींनी मोफत वाटले अनेकांना यापैकी कोणत्याही प्रकारे तिरंगा न मिळाल्याने बहुतांशी देशप्रेमी जनतेला या महोत्सवाच्या आवाहनाला प्रतिसाद देता आला नाही.

घरोघरी तिरंगा फडकविण्याचे आवाहन करण्यासाठी तहसिलदार दिप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनप्रबोधन करणारी मोटारसायकल रॅली काढण्यात आल्यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींनी आवाहनफेरी काढली. यानंतर पोलादपूर डाक कार्यालय, विविध सरकारी कार्यालये, रेशन दुकानदार, ग्रामपंचायत कार्यालय तसेच अन्य ठिकाणी तिरंगा झेंडा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. नगरपंचायतीच्या एका नगरसेविकेने तिरंगा विक्रीसाठी प्रत्येकी 30 रूपये दर आकारला नंतर दुसर्‍या नगरसेविकेने नागरिकांना मोफत तिरंगा झेंडा वाटप केल्याचे पाहून घरोघरी जाऊन मोफत वाटप केले. काही गावांमध्ये रास्त भाव दुकानदारांनी तिरंगा वाटप केले तर काहिंनी केवळ स्वत:च्या दुकानावर तिरंगा फडकविला.

काही ग्रामपंचायतींच्या इमारतींना तिरंगी प्रकाशझोताने आकर्षक रोषणाई करण्यात आली असून काही ग्रामपंचायत कार्यालयांवर केवळ तिरंगा फडकविण्यात येऊन ग्रामसेवक आणि सरपंचांसह कर्मचारीवृंद सलामी देऊन घरोघरी तिरंगा फडकविण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. पोलादपूर शहरामध्ये राजकीय पक्ष तसेच नगरसेवकांनी वाटप केलेल्या तिरंगा झेंडयांना घरोघरी तिरंगा अभियानानुसार फडकविण्याचे काम अनेक नागरिकांनी चोख बजावले. दरम्यान, सोमवारी तिसरा श्रावणी सोमवार, संकष्टी चतुर्थी आणि स्वातंत्र्यदिन असल्याने जिलेबी बटाटावडा आणि अन्य व्यवसायांची 15 ऑगस्ट निमित्तची ग्राहकपरंपरा धोक्यात आली आहे.

Exit mobile version