| रायगड | खास प्रतिनिधी |
मंत्रीपद मला मिळणार होते. मात्र आमच्यातीलच एका सहकाऱ्याने सांगितले तुम्ही मंत्री झालात आणि मला मंत्रीपद दिले नाही तर माझी बायको आत्महत्या करेल. एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाही, तिसरा म्हणाला मला मंत्रिपद मिळाले नाही तर मी राजीनामा देतो. त्यामुळे त्यांच्यासाठी मंत्रीपदासाठी थांबलो. ते आजपर्यंत थांबलोच, असे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी आपल्याला मंत्रीपद न मिळण्या मागचा मजेदार किस्सा सांगितला. अलिबाग येथील एका कार्यक्रमासाठी आमदार भरत गोगावले आज अलिबागमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
मी एकाला फोन केला अरे तुमच्या संभाजी नगरमध्ये पाचपैकी दोघांना मंत्रीपद दिली. तुला काय घाई आहे, असे सांगून त्याला थांबवले. आम्ही थांबलो ते अजूनपर्यंत थांबलो. तेंव्हा सगळ्या आमदारांनी आमचे कौतुक केले, आता मला बडबडत आहेत. आजकाल पंचायत समितीचा सदस्य देखील बोलायचे सोडत नाही, असे गोगावले म्हणाले.
राज्यात शिंदेनी बंड करुन भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमदार भरत गोगावले सर्वात पुढे होते. शिंदे यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांना आमदार गोगावले यांनी साथ दिली होती. सुरत-गुवाहाटी-मुंबई असा प्रवास शिंदे गटातील आमदारांनी केला होता. त्यावेळी आमदार गोगावले हे महत्वाची भूमिका पार पाडत होते. शिंदे यांचे अत्यंत विश्वासू असल्याने आमदार गोगावले यांची मंत्रीपदी वर्णी लागणार असे सुरुवातीपासूनच त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांना वाटत होते. मात्र सत्तेत सहभागी झाल्यानंतर आमदार गोगावलेंऐवजी अन्य आमदारांनीच मंत्रीपदाची शपथ घेतली होती. अन्य सहकाऱ्यांना संधी देताना मात्र गोगावले यांची मंत्रीपदाची इच्छा अपुरीच राहीली आहे.







