देवेंद्रांसारखी अवस्था होईल
| छ. संभाजीनगर | प्रतिनिधी |
अजित पवार यांच्यासोबतच्या वारंवार भेटींमुळे निर्माण झालेल्या विविध संभ्रमांवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज अखेर पडदा टाकला. येथील पत्रकार परिषदेत त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला. इडीच्या दबावामुळेच राजकीय नेते पक्षांतराचे निर्णय घेत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह काढून घेण्यासाठी निवडणूक आयोगावर केंद्रातील शक्तींनी दबाव टाकल्याचा आरोप करुन राष्ट्रवादीचे चिन्हही असेच काढून घेतले जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. पुढील 15 ऑगस्टला आपणच पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून भाषण करू या नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचीही त्यांनी खिल्ली उडवली. मी पुन्हा येईन असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचे काय झाले, त्याची आठवण त्यांनी करून दिली. मोदी सरकारच्या विरोधात इंडिया आघाडी ठामपणे लढत असून देशात मोदी सरकारच्या विरोधात मोठे वातावरण आहे असा दावाही त्यांनी केला.
संभाजीनगरच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवारांनी प्रसार माध्यमांशी बोलताना विविध प्रश्नांना उत्तरे देताना मोदी सरकार, सरकारी यंत्रणांना लक्ष्य केले. तसेच अजित पवारांसमवेत झालेल्या बैठकीवरुनही त्यांनी आपली भूूमिका स्पष्ट केले. शरद पवार म्हणाले, अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आम्ही राजकीय चर्चा केलीच नाही. माझ्याशी कोण चर्चा करणार आहे. ज्या पक्षात हे सर्व नेते होते त्या पक्षाचा संस्थापक कोण आहे. त्या पक्षाचा वरिष्ठ व्यक्ती कोण आहे. यात आणखी कुणी चर्चा करायला येईल असं म्हणण्याचं काही कारण नाही. त्याला कुणीही महत्त्व देण्याचं काहीही कारण नाही, असेही त्यांनी सुचित केले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांनी मोदींविरोधात लढण्याची भूमिका स्पष्ट करून संभ्रम दूर करण्याची मागणी केली. त्याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले, मी माझ्या पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच मोदींचं गुणगान गायलं आहे का? माझं म्हणणं सर्वांनी ऐकलं आहे, असेही त्यांनी सांगितले.
मी पवार कुटुंबाचा प्रमुख आहे पवार कुटुंबातील आम्ही एकंदर जे सर्व भाऊ, बहिणी आहोत त्या कुटुंबाचा प्रमुख मी आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबात एक पद्धत आहे की, कुठलाही कौटुंबिक प्रश्न असेल तर माझ्याशी बोलतात, माझा सल्ला घेतात. त्यासाठी कुणी आलं असेल,तर त्याचा अधिक किस काढण्याचं काही कारण नाही, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.
तुमच्या गुप्त भेटीमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाने वेगळा प्लॅन केलाय का? राष्ट्रवादीला बाजूला ठेऊन काँग्रेस-शिवसेना (ठाकरे गट) एकत्र येणार आहे का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीला बाजूला ठेऊन काँग्रेस-शिवसेना (ठाकरे गट) एकत्र येणार अशी चर्चा आहे, पण ही वस्तूस्थिती नाही. तुम्ही आजचं संजय राऊत यांचं वक्तव्य वाचलं असेल, तर या सगळ्या गोष्टी असत्यावर आधारित आहेत, असं त्यांनी निवेदन दिलं आहे.
यंत्रणांबाबत साशंकता शरद पवारांनी केंद्रीय यंत्रणाच्या कारवाईवरुन भाजपाला टोला लगावला आहे. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रीय नेत्यांपेक्षा ईडी निर्णय घेते. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावाच्या कामावरही प्रश्न उपस्थित केले. ठाकरे गटाच्या संदर्भात निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता त्यात केंद्र सरकारने हस्तक्षेप केला होता, असा आरोपही त्यांनी केला. ठाकरे गटासोबत जे चिन्हाबाबत झालं, ते आमच्यासोबतही होऊ शकतं, असंही मत त्यांनी नोंदवलं. त्यांच्या बोलण्यातून केंद्रीय संस्थावरील अविश्वास स्पष्ट झळकत होता.
यावेळी त्यांनी 2024च्या निवडणूकीचं भाकीतंही वर्तवलं. त्यांनी दावा केला की, 2024 मधील निवडणूक भाजपसाठी अनुकूल नाही. अनेक राज्यांमध्ये सरकार पाडून भाजप सत्तेत आलंय, असेही ते म्हणाले.